पुजारा-रहाणेमुळे युवा खेळाडूंना मिळेना संधी, संघातून हकालपट्टी करण्याची होतेय मागणी

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील शेवटचा सामना केपटाऊनमध्ये सुरू आहे. गुरुवारी भारताचा दुसरा डाव पूर्णपणे फसला. या मालिकेत मधल्या फळीने टीम इंडियाला पुर्णपणे निराश केले. सर्वाधिक प्रश्न वरिष्ठ खेळाडू चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेवर उपस्थित केले जात आहेत.

मालिका सुरूही झालेली नसताना त्या वेळी दोघांच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र संघ व्यवस्थापनाने वरिष्ठ खेळाडूंना संधी देत त्यांना या मालिकेत संधी देण्याचे ठरवले होते. मात्र आता तिन्ही कसोटी सामने पाहिल्यानंतर व्यवस्थापनाचा हा निर्णय चुकीचा ठरल्याचे चित्र दिसत आहे.

चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या बॅटने काहीही कमाल दाखवू शकले नाहीत. देशांतर्गत असो किंवा परदेशात दोघांनी खास कामगिरी केलेली नाही. या मालिकेतही असेच काहीसे घडले आहे. जर आपण चेतेश्वर पुजाराबद्दल बोललो तर तीन सामन्यांच्या एकूण 6 डावात त्याच्या बॅटमधून फक्त 124 धावा आल्या, त्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे.

त्याच बरोबर अजिंक्य रहाणेने 3 सामन्यांच्या 6 डावात 136 धावा केल्या असून त्याच्या बॅटने देखील अर्धशतक झळकावले आहे. अजिंक्य रहाणेने शेवटचे शतक 2020 मध्ये झळकले होते, जेव्हा त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कर्णधार असताना मेलबर्न कसोटीत शतक झळकावले होते. चेतेश्वर पुजाराचे शेवटचे शतक 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आले होते. त्याने सिडनीमध्ये 193 धावा केल्या होत्या.

काही माजी क्रिकेटपटूंनी चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना वारंवार संधी देण्यावरही प्रश्न उपस्थित केले होते. कारण गेल्या दोन वर्षांपासून हे घडत आहे, जेव्हा दोघांची सरासरी 20 च्या आसपास आहे. चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या श्रेयस अय्यरला या दोघांच्या समावेशामुळे बाहेर बसावे लागले, तसेच संघात येण्यासाठी सज्ज असलेले हनुमा विहारी, सूर्यकुमार यादव यांनाही त्यांच्यामुळे संधी मिळत नाहीये. आता दोघांची संघातून हकालपट्टी करा अशी मागणी होत आहे.

श्रेयस अय्यरने कसोटी पदार्पणात शतक झळकावले होते, तर हनुमा विहारीने सिडनी कसोटीत ऐतिहासिक खेळी केल्यानंतर केवळ दोनच सामने खेळले आहेत. अशा स्थितीत या मालिकेत या युवा खेळाडूंना बाहेर बसावे लागले असले तरी येत्या कसोटी मालिकेत सीनियर आणि ज्युनियरमधून कोणाची निवड करायची, असा प्रश्न निवडकर्त्यांसमोर, संघ व्यवस्थापनासमोर उभा राहिला आहे.

चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे यांच्याशिवाय मयंक अग्रवालवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुलसोबत मयंक अग्रवालला सलामीची संधी मिळाली. संपूर्ण मालिकेत त्याला या संधीचा फायदा घेता आला नाही. या मालिकेत मयंक अग्रवाल केवळ 135 धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत पुढील कसोटी मालिकेत रोहित शर्माचे पुनरागमन झाले तर मयंक अग्रवालला संधी मिळणे कठीण आहे.

महत्वाच्या बातम्या
होम लोनऐवजी भाड्याच्या घरात राहा आणि EMI च्या पैशांनी घ्या २-३ घरे, जाणून घ्या कसे
मोबाईलवर बोलत असताना कॉल मर्ज करू नका, नाहीतर तुमचे बँक खाते होईल रिकामे
मोबाईलवर बोलत असताना कॉल मर्ज करू नका, नाहीतर तुमचे बँक खाते होईल रिकामे
“गोडसेंचे गोडवे गाणाऱ्यांवर कोणतीच कारवाई नाही, पण मोदींवर टीका करणाऱ्या किरणला देशद्रोही ठरवतात”