Share

‘पोरक्यांना आपलसं करणाऱ्या माई गेल्या अन् महाराष्ट्र पोरका झाला’; माईंच्या निधनाने हळहळला अभिनेता

अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांचं काल ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्यांच्या निधनाने देशभरातून हळहळ व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्र त्यांच्या जाण्याने पोरका झाला आहे, असे म्हणत अनेकजण त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाबाबत आपला शोक व्यक्त केला. आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती. त्यांच्या अचानक जाण्यानं समाजसेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे, अशा शब्दात त्यांनी सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत.

त्याचबरोबर सिनेसृष्टीतील अनेक कलाकारही सिंधुताई यांना सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहत आहेत. यादरम्यान अभिनेता संदीप पाठक यांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सिंधुताईंच्या निधनाच्या बातमीने धक्का बसल्याचे म्हटले आहे.

संदीप पाठक यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर सिंधुताईंसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत त्यांनी लिहिले की, ‘सिंधुताईच्या निधनाची बातमी कळताच धक्का बसला, मन सुन्न झालं. काही दिवसांपूर्वीच माईंची भेट झाली होती. वऱ्हाडचा संपूर्ण प्रयोग त्यांनी बघितला आणि शाबासकी दिली.

‘इतकी सकारात्मक, हसतमुख, जगण्यात प्रचंड उर्जा असणारी व्यक्ती मी बघितली नाही. माझं भाग्य की, मला त्यांचे आशिर्वाद मिळाले. त्या आज आपल्यात नसल्या तरी त्यांच्या महान कार्याने त्या आपल्याला सतत प्रेरणा देत राहतील. सिंधुताई सपकाळ यांच्या आत्म्यास शांती लाभो.

दरम्यान, सिंधुताई यांच्यावर दीड महिन्यापूर्वी हार्नियाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर रूग्णालयातच त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यानच मंगळवारी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर आज पुण्यातील ठोसरपागा स्मशानभूमीत दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या :  

सिंधूताईंच्या निधनाने पंतप्रधान मोदींना अतिव दुख:; पहा श्रद्धांजली वाहताना काय म्हणाले..
अनाथांचे पोट भरण्यासाठी ट्रेनमध्ये मागितली भीक; स्मशानात जळणाऱ्या प्रेतावर भाकरी भाजून खाल्ली “
‘अनाथांची मातृदेवता हरपली ..!’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सिंधुताई सपकाळ यांना श्रध्दांजली

मनोरंजन

Join WhatsApp

Join Now