Homeताज्या बातम्या'अनाथांची मातृदेवता हरपली ..!' मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सिंधुताई सपकाळ यांना...

‘अनाथांची मातृदेवता हरपली ..!’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सिंधुताई सपकाळ यांना श्रध्दांजली

मुंबई, दि. ४:- ‘सिंधुताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती. त्यांच्या अचानक जाण्यानं समाजसेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत.

अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या अनाथांची माय सिंधूताई सपकाळ यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. सिंधूताई सपकाळ या ७५ वर्षांच्या होत्या. रात्री ८ वाजून १० मिनिटांनी त्यांचे निधन झाले आहे. पुण्यातील गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. तिथेच त्यांची प्राण ज्योत मावळली आहे. (Sindhutai Sapkal)

सिंधूताई सपकाळ यांचे महिन्याभरापूर्वी हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण आज त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु झाला आहे

सिंधुताईंनी निराधारांना आधार दिला. त्याचबरोबर शिक्षणाच्या माध्यमातून अनेकांना उभे केले. विशेषत: मुलींचे शिक्षण आणि त्यांनी स्वावलंबी व्हावे यासाठीचे त्यांचे योगदान महाराष्ट्र विसरू शकणार नाही अशी श्रद्धाजंली मुख्यमंत्र्यांनी वाहिली आहे.

दीड वर्षांपूर्वी सिंधूताईनी स्वतः आपल्याशी दूरध्वनीवर बोलून विचारपूस केली होती आणि कोविडच्या लढ्यासाठी बळ दिलं होतं याची आठवण काढून मुख्यमंत्री म्हणतात की, महाराष्ट्राची मदर तेरेसा असं त्यांना संबोधलं जायचं ते अगदी बरोबर होतं. दुःख कुरवाळत बसू नका तर पुढे चालत रहा हे त्यांच्या जीवनाचं तत्व होतं.

इतक्या खस्ता त्यांनी खाल्ल्या, कष्ट उपसले, समाजाकडून कायम दुस्वास होत होता, पण माईंनी त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य मिटू दिलं नाही. पद्मश्री सारखा महत्वाचा पुरस्कार मिळूनही त्या आपल्या प्रतिक्रियेत म्हणाल्या होत्या की मला अजूनही अनेकांपर्यंत पोहचून त्यांना घास भरावयाचे आहेत.

साधी राहणी, उच्च विचारसरणी याचे यापेक्षा काय उदाहरण असेल? त्या सदैव अनाथ, निराधारांच्या कल्याणाचा विचार करत असत. स्वतःच्या जीवनात आलेला दुःखाला बाजूला सारून त्यांनी अनेकांना आधार दिला. शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कामाचा डोंगर उभा केला. या कामामुळेच अनेक मुली, महिला, निराधारांना आयुष्यात मायेची सावली मिळाली.

त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या समाजजीवनात आपल्या कामाने आदर्श निर्माण करणारी, अनेक निराधारांच्या आयुष्यातील मायेची सावली हरपली आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताईंना भावपूर्ण श्रद्धांजली.

महत्वाच्या बातम्या
धक्कादायक! अनाथांची माय सिंधूताई सपकाळ यांचं पुण्यात निधन
खरा हिरो! २६ अनाथाश्रम, २५ शाळा, १६ वृद्धाश्रम एकटा चालवत होता पुनीत; मृत्युनंतर नेत्रही केले दान
बालविवाह झाल्यानंतर गर्भवती असताना पतीने घराबाहेर काढले, नंतर झाल्या १५०० मुलांच्या आई

ताज्या बातम्या