Share

‘सिनेमा झाला आणि ही पोरगी आपली एकदम झक्कास मैत्रीण झाली’, विजू मानेंची पोस्ट चर्चेत

भाऊ कदम आणि कुशल बद्रिके अभिनित ‘पांडू’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसुद्धा मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाला प्रदर्शित होऊन सहा आठवडे झाली असून प्रेक्षकांचा त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. यादरम्यान चित्रपटाचे दिग्दर्शक विजू माने यांनी सोनाली कुलकर्णीसाठी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

विजू माने यांनी त्यांच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम हँडलवर ही पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी सोनालीसोबतचा एक फोटो शेअर करत लिहिले की, ‘ठाण्यात एक इव्हेंट करत होतो. इवेंटमध्ये ‘ती’ परफॉर्म करणार होती. तिच्यासोबत तिची आई सगळीकडे असायची. टिपिकल हीरोइन की मम्मी वाटायचं मला. मी इव्हेंट लिहीला आणि direct केला पण त्यावेळेला काही आमचं संभाषण होऊ शकलं नाही’.

‘पांडूच्या कास्टिंगबद्दल चर्चा सुरू असताना अचानक अश्विन पाटीलने तिचे नाव काढलं. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर तिचं नाव येताक्षणी मी हंड्रेड पर्सेंट कन्व्हिन्स्ड नव्हतो. पण झी स्टुडीओजचे सर्वेसर्वा मंगेश कुलकर्णी आणि अश्विन यांनी मला पटवून दिलं’.

‘मी कन्व्हीन्स नसण्याचं कारण मला स्टार पदाला पोहोचलेल्या नट्यांचे नखरे आवडत नाहीत. सिनेमातल्या कॅरेक्टरपेक्षा यांच्या कॅरेक्टरवर अधिक बोललं जातं. सगळ्या पर्यायांमधून शेवटी एकदाचं तिचं कास्टिंग झालं, सिनेमा झाला आणि ही पोरगी आपली एकदम झक्कास मैत्रीण झाली’.

पुढे सोनालीचे कौतुक करताना विजू यांनी लिहिले की, ‘खरंच स्टारपद असलेल्या हीरोइनबद्दल बऱ्या-वाईट चर्चा कायमच होत असतात. तो त्यांच्या आयुष्याचा एक भाग आहे. पण मी सोनालीबद्दल का कोण जाणे थोडं वाईटच असं ऐकून होतो. सेटवर खूप त्रास देते, दिग्दर्शकाला स्वतःच्या सूचना देते.

‘पहिला दिवस शूटिंगचा येईपर्यंत मला सतत असं वाटायचं की, माझ्या आणि तिच्यात सेटवर खटके उडणार. पण to my surprise सेटवरच्या पहिल्या शॉटपासून ते प्रमोशनच्या शेवटच्या दिवसापर्यंत आमच्यात वादाचा असा मुद्दाच आला नाही’.

मुळात ती माझ्या अपेक्षेपेक्षा अत्यंत वेगळी होती. सेटवर कधीही एक सेकंद देखील उशिरा पोहोचली नाही. उलट दिलेल्या वेळेच्या पंधरा मिनिटे तरी आधी ती कुठेही हजर असते. मग ती मीटिंग असो, शिबिर असो, फोटोसेशन असो, डान्स असो किंवा शूटिंग असो. आपण सेटवर असताना इतर कुठल्याही गप्पा न मारता, केवळ आपल्या सिनेमातील कॅरेक्टरबद्दल गप्पा मारायची’.

‘खरंतर, उषा कॅरेक्टरचे कॉश्च्युम डिझाइन करताना तिने खूप जास्त मेहनत घेतली आहे. उषाच्या नाकातल्या nosering पासून ते तिच्या साडीच्या पदराला असलेल्या गाठीपर्यंत तिने स्वतः विचार विनिमय करून बनवल्यात. प्रसंगी स्वतःचे कपडेदेखील तिने सिनेमात वापरले आहेत. शिवाय वजन कमी करून ती गाण्यात लाजवाब दिसली आहे’.

‘सिनेमासाठी passionately काम करणारी अभिनेत्री आहे ही. आणि जितकी सिनेमाच्या रोल बाबतीत गंभीर तितकीच सेटवरच्या कुरापतीमध्ये लबाड आणि खट्याळ. एखाद्याचा आपण पाणउतारा केलाय हे त्याला नकळता आजूबाजूच्यांना दाखवून देण्याची तिच्यात ‘विशेष’ कला आहे’.

‘तिच्या आणखी एका गोष्टीचं फार अप्रूप वाटतं, ते म्हणजे प्रोफेशनलिझम. आपला हा सिनेमा सुरू असतानाच आपल्या वक्तशीर आणि ‘जेवढ्यास तेवढ्या’ वागण्याने अख्या युनिटच्या माणसांना आपलंसं करणे तिला करेक्ट जमतं. तिचे मार्केटिंग इतक्या सोप्या आणि बेमालूम पद्धतीने करते की पुढच्या सिनेमाचा विचार करताना एखादा दिग्दर्शक तिचा नक्कीच सगळ्यात आधी विचार करेल. (ही माझ्यासहित सर्वांनाच शिकण्यासारखी गोष्ट आहे)’.

‘पांडू सिनेमा आता सहाव्या आठवड्यात गेलाय. आणि आनंदाची म्हणा किंवा अभिमानाची म्हणा गोष्ट आहे की, गेल्या आठवड्यातल्या ५०० शोजवरून त्याची संख्या वाढून आता ८०० इतकी झाली आहे. या यशाच्या अनेक कारणांपैकी एक महत्त्वाचं कारण ‘सोनाली कुलकर्णी’ सुद्धा आहे. थँक्यू सोनाली या प्रोजेक्टचा विशेष भाग झाल्याबद्दल. बाकी थोडा कुचकटपणा कमी केलास तर तू उत्तम माणूस आहेस, असा सल्लाही विजू यांनी यावेळी सोनालीला दिला.

महत्त्वाच्या बातम्या : 

मुलाखत देताना बदनामी केली म्हणून सलमानने शेजाऱ्यावरच दाखल केला गुन्हा, वाचा संपुर्ण प्रकरण

अभिनेते किरण मानेंनी घेतली थेट शरद पवारांची भेट; राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

टिकटॉक स्टार सुरज चव्हाणची ‘सैराट’ भरारी; मराठी चित्रपटात हिरो म्हणून झळकणार

मनोरंजन

Join WhatsApp

Join Now