---Advertisement---

अजित पवारांचा पीए असल्याचा दावा; सरकारी शिक्षकाची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 21.46 लाखांची फसवणूक; सोलापूरमधून आरोपीला अटक

Published On: October 22, 2026
Follow Us
---Advertisement---

मीरा-भाईंदर : सरकारी शाळेत शिक्षकाची नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देत एका महिला आणि तिच्या मैत्रिणीची 21 लाख 46 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भाईंदर पोलिसांनी तुलसीदास जाधव (वय 40) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला सोलापूर येथून अटक केली आहे. विशेष म्हणजे, या आरोपीविरोधात महाराष्ट्रातील 11 ठिकाणी अशाच प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुलसीदास जाधव याने 2025 मध्ये संबंधित महिलेच्या वडिलांशी संपर्क साधला होता. आपण दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वैयक्तिक सहाय्यक (पीए) असल्याचे सांगून त्याने त्यांचा विश्वास संपादन केल्याचा आरोप आहे. तसेच, आपण शिक्षक संघटनेशी संबंधित असून अनेकांना सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्या आहेत, असेही त्याने भासवले होते.

महिलेची मुलगी आणि तिच्या मैत्रिणीला सरकारी शाळेत शिक्षकाची नोकरी मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवत जाधव याने संबंधित महिलेच्या वडिलांकडून 21 लाख 46 हजार रुपये घेतल्याचा आरोप आहे. मात्र, पैसे घेतल्यानंतर त्याने मोबाईल बंद केला आणि संपर्क तोडला. दोघींनाही नोकरी मिळाली नाही आणि पैसेही परत न मिळाल्याने अखेर संबंधितांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

तक्रारीच्या आधारे भाईंदर पोलिसांनी जाधव याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवून त्याला सोलापूर येथून अटक केली. तपासादरम्यान आरोपीच्या मोबाईलमध्ये राज्यातील विविध राजकीय नेत्यांसोबतचे फोटो आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणाची माहिती देताना परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण यांनी सांगितले की, आरोपीने राजकीय नेत्यांशी जवळीक असल्याचे भासवून फिर्यादी आणि त्यांच्या मैत्रिणीचा विश्वास जिंकला. सरकारी नोकरीचे आश्वासन देऊन त्यांच्याकडून पैसे घेतल्यानंतर त्याने संपर्क बंद केला. आरोपीविरोधात राज्यात अशाच प्रकारचे 11 गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे.

इतर फसवणूकग्रस्तांना पुढे येण्याचे आवाहन

तुलसीदास जाधव याने आणखी काही लोकांची अशाच प्रकारे फसवणूक केली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सरकारी नोकरीचे आमिष दाखवून या आरोपीने कोणाची फसवणूक केली असल्यास, संबंधितांनी पुढे येऊन भाईंदर पोलीस ठाण्यात तक्रार किंवा आपला जबाब नोंदवावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment