चीनच्या कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या श्रीलंकेत महागाई गगनाला भिडत आहे. लोकांना तांदूळ, तेल, औषध या जीवनावश्यक वस्तू मिळणे कठीण झाले आहे. आर्थिक अडचणींमुळे श्रीलंका बाहेरून तेल आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची आयात करू शकत नाही, त्यामुळे देशात पेट्रोल, डिझेल आणि खाद्यपदार्थांसह जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी आणीबाणी लागू केली आहे. (india help shrilanka to cricis)
सुरक्षेसाठी लष्कर तैनात करण्यात आले आहे. आणीबाणीच्या घोषणेच्या पहिल्या दिवशी शनिवारी श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था असताना दुकाने उघडली गेली. दुकानांबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अशा काळात भारताने श्रीलंकेसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. भारताने श्रीलंकेला आता १ अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले आहे.
भारतातून डिझेल घेऊन जाणारे जहाज श्रीलंकेत पोहोचले आहे. भारताने श्रीलंकेला तांदूळ पुरवठा सुरू केला आहे. भारत ४० हजार टन तांदूळ श्रीलंकेला पाठवत आहे. तांदळाची खेप जहाजांमध्ये भरली जात आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार देश आहे.
भारताने श्रीलंकेला तांदूळ पाठवल्याने तेथील तांदळाच्या किमती कमी होतील. श्रीलंकेत तांदळाच्या किमती एका वर्षात दुपटीने वाढल्या आहेत. लोकांना तांदुळ खरेदी करणे शक्य होत नाहीये, त्यामुळे लोकही त्याला तीव्र विरोध करत आहेत. श्रीलंकेतील इंडियन ऑइल कॉर्पोरेशनची उपकंपनी असलेल्या लंका आयओसीने सांगितले की, वीज टंचाई कमी करण्यासाठी ते ६ हजार मेट्रिक टन इंधन पुरवेल.
श्रीलंकेतून निर्वासित भारतात येत आहेत. २००९ मध्ये तीन दशकांचे गृहयुद्ध संपल्यानंतर तामिळनाडूच्या किनारपट्टीवर निर्वासितांची येण्याची ही पहिलीच वेळ आहे. रामेश्वरममध्ये आलेल्या लोकांनी सांगितले की, शहरे आणि गावांमध्ये अन्न आणि काम नसल्याने त्यांना देश सोडून पळून जावे लागले.
श्रीलंकेच्या आर्थिक संकटाचे प्रमुख कारण म्हणजे वाढते कर्ज. श्रीलंकेला पुढील १२ महिन्यांत ७.३ अब्ज डॉलरचे विदेशी कर्ज फेडायचे आहे. श्रीलंकेच्या एकूण कर्जामध्ये चीनचा वाटा ६८ टक्के आहे. त्यामुळे देशाचे परकीय चलन इतके कमी झाले आहे की ते इंधन आणि अन्नधान्याच्या आयातीचे पैसेही देऊ शकत नाहीत. पर्यटन हा श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मात्र कोरोनामुळे त्याचावर वाईट परिणाम झाला आहे.
महत्वाच्या बातम्या-
मुख्यमंत्र्यांना आदर्श म्हणून डोळ्यासमोर ठेवा, त्यांच्यासारखं सडपातळ व्हा; अजित पवारांचा पोलिसांना सल्ला
आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील मुख्य साक्षीदाराचा अचानक मृत्यू, बायकोनं सांगितलं नेमकं काय घडलं
कंगनाने केले ‘RRR’ आणि राजमौली यांचे तोंडभरून कौतुक, म्हणाली, ते किंग आहेत आणि त्यांना..