बऱ्याच दिवसांपासून नेत्यांच्या अपघाताचे सत्र सुरूच आहे. अनेक नेत्यांचे अपघात झाले पण कोणाला जास्त दुखापत झाली नाही. नुकताच बच्चू कडू यांचाही अपघात झाला. या अपघातात ते बचावले पण त्यांच्या डोक्याला मार लागला. यानंतर अनेक जणांनी त्यांच्या तब्येतीबाबत काळजी व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे फायरब्रॅंड नेते अमोल मिटकरी यांनीही काळजी व्यक्त केली. ते म्हणाले की, जरी आमचे राजकीय मतभेद असतील, त्यांचा आणि माझा राजकीय पक्ष वेगळा असेल, पण अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी जिल्ह्यातील दिव्यांगासाठी केलेलं काम मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे.
असा व्यक्ती सातत्याने सरकारमध्ये असताना सरकारच्या विरोधात बोलतो. आज त्या व्यक्तीला एखादा दुचाकीस्वार येऊन उडवतो अन् गंभीर दुखापत करतो. मला वाटतं काहीतरी काळंबेरं आहे, असं अमोट मिटकरी म्हणाले आहेत. तसेच त्यांनी या घटनेची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही केली आहे.
बच्चू कडूंच्या डोक्याला आणि उजव्या पायाला मोठा प्रमाणात इजा झाल्याची माहिती मिळाली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीप्रमाणे त्यांच्या डोक्याला ४ टाके पडले आहेत. सकाळी अमरावती शहरात रस्ता ओलांडताना त्यांना एका दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली.
दुचाकीने धडक दिल्यानंतर बच्चू कडू रोडच्या दुभाजकाला जोरदार आदळले. त्यानंतर त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यांच्या डोक्याला मोठ्या प्रमाणावर मार लागला. बच्चू कडू यांच्यावर अमरावतीतील एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले असून सध्या त्यांना नागपूरच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. सकाळी प्रकृती उत्तम आहे असं सांगण्यात आलं होतं पण दुपारी त्यांची प्रकृती अचानक कशी खालावली असा प्रश्न त्यांच्या कार्यकर्त्यांना पडला आहे.
यादरम्यान, अमोल मिटकरींनी खळबळजनक आरोप लावले. त्यांचं म्हणणं आहे की, बच्चू कडूंनी सातत्याने घेतली बंडाची, विद्रोहाची बाजू या अपघातामागे तर नाही ना? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, या अपघातानंतर मलाही संशय येत आहे. भारतीय जनता पार्टीने एखाद्या व्यक्तीकडून काही करून घेतलं का? अशी शंका उपस्थित करत त्यांनी चौकशीची मागणी केली आहे.