---Advertisement---

“जरांगे डुप्लिकेट मराठा, एकनाथ शिंदेंविरोधात सुपारी घेऊन बोलतात”; शिवसेना उपजिल्हाप्रमुखांचा जरांगेना तोंडाला काळं फासण्याचा इशारा

Published On: October 23, 2026
Follow Us
---Advertisement---

जालना : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्यावर शिवसेनेचे जालना उपजिल्हाप्रमुख धनंजय पोहेकर यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे. जरांगे यांनी पत्रकार परिषदेत मोठा बॉम्ब फोडण्याचा दावा केला होता; मात्र त्यांनी कोणतेही ठोस पुरावे न देता फुसका फटाका फोडल्याचा आरोप पोहेकर यांनी केला. तसेच, जरांगे यांच्या तोंडाला काळं फासण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांना बदनाम करण्याचा आरोप

धनंजय पोहेकर यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका करताना एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी त्यांनी सुपारी घेतल्याचा आरोप केला. ही सुपारी कोणी दिली, याचा खुलासा लवकरच करण्यात येईल, असा दावाही त्यांनी केला.

यावेळी पोहेकर यांनी जरांगे यांच्या मराठा समाजातील स्थानावर प्रश्न उपस्थित करत त्यांना ‘डुप्लिकेट मराठा’ असे संबोधले. तसेच, पाटील आडनाव आणि ९६ कुळी मराठा असल्याच्या मुद्द्यावरूनही त्यांनी जरांगे यांच्यावर निशाणा साधला. दुसरीकडे, संपूर्ण मराठा समाज एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या पाठीशी असल्याचा दावाही पोहेकर यांनी केला.

अडीच वर्षांनंतर ऑडिओ क्लिप समोर येण्यामागे काय कारण?

मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली. समोर आलेल्या संभाषणाची फॉरेन्सिक तपासणी केली जाईल आणि त्यातून सत्य समोर आणले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित संभाषण अडीच वर्षांनंतरच सार्वजनिक का करण्यात आले, तसेच या प्रकरणातून नेमके कोणाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केले. या प्रकरणाच्या चौकशीची मागणी मनोज जरांगे यांच्यासह शिवसेनेच्या शिष्टमंडळानेही केल्याचे त्यांनी सांगितले.

ऑडिओ क्लिपमधील संभाषणाची सत्यता तपासल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असे संकेत फडणवीस यांनी दिले. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीतून नेमकी कोणती माहिती समोर येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment