देशातील प्रसिद्ध कलाकार आणि संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा, ज्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते, त्यांचे १० मे रोजी निधन झाले. शिवकुमार शर्मा हे ८४ वर्षांचे होते. ते दीर्घकाळापासून किडनीच्या आजाराशी झुंज देत होते आणि सध्या ते डायलिसिसवर होते. (zakir husain on shivkumar shrma funeral)
शिवकुमार शर्मा यांच्यावर उपचार सुरु होते, याच दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे मित्र आणि प्रसिद्ध तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन हेही त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले होते. झाकीर हुसेन यांचे आपल्या जोडीदाराला अखेरचा निरोप देतानाचे भावनिक फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
पंडित शिवकुमार शर्मा हे मुंबईतील पाली हिल परिसरात राहत होते. मंगळवारी सकाळी निधन झाल्यानंतर त्यांच्यावर विलेपार्ले येथील पवन हंस स्मशानभूमीत पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबई पोलिसांनी त्यांच्या अंत्ययात्रेला तिरंग्याने झाकून त्यांच्या मृतदेहाला खांदा दिला. तसेच स्मशानभूमीत गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.
शिवकुमार शर्मा यांच्या मुलांनी पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. यावेळी अभिनेते अमिताभ बच्चन, जया बच्चन, शबाना आझमी, गीतकार जावेद अख्तर, संगीतकार जोडी जतिन-ललित आणि गायिका इला अरुण यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी अभिजीत सहकारी गृहनिर्माण संस्थेला भेट देऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली.
अशात सोशल मीडियावर झाकीर हुसेन यांचा एक फोटो चांगलाच व्हायरल होत असल्यामुळे ते चर्चेत आले आहे. उस्ताद झाकीर हुसेन हे त्यांचे स्टेज पार्टनर पंडित शिवकुमार शर्मा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. पार्थिव देहालाही त्यांनी खांदा दिला होता.
पंडित शिवकुमार शर्मा यांच्या पार्थिवावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले तेव्हा ते त्यांचा मित्र कायमचा निघून जाताना पाहत होते. उस्ताद झाकीर हुसैन यांचे हे उदास आणि शांत दिसणारे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. यावेळी झाकीर हुसेन यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. हे पाहून अनेकजण भावूक झाले आहे.
संतूर वादक शिवकुमार शर्मा आणि तबला वादक झाकीर हुसेन यांनी दीर्घकाळ एकत्र अनेक स्टेज शो केले. या दोघांच्या उत्कृष्ट कलांमुळे सर्वच शो हिट झाले. जम्मू-काश्मीरचे लोक वाद्य संतूरला जागतिक स्तरावर नेण्याचे श्रेय शिवकुमार शर्मा यांनाच दिले जाते.
महत्वाच्या बातम्या-
राज ठाकरे आणि आनंद दिघेंचा हॉस्पिटलमधला शेवटचा संवाद व्हायरल; हिंदुत्वावर बोलताना म्हणाले होते की…
भाचीवर बलात्कार करणाऱ्या मामाची सुप्रीम कोर्टाने केली सुटका, १० वर्षांची शिक्षा केली रद्द; कारण वाचून धक्का बसेल
दुःखद बातमी! ऑस्ट्रेलियाचा माजी ऑलराऊंडर अँड्र्यू सायमंड्सचे अपघाती निधन, चाहत्यांना मोठा धक्का