देशात नुकत्याच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूका पार पडल्या आहेत. या निवडणुकीत भाजपने काँग्रेसचा दारुण पराभव केला आहे. त्यामुळे काँग्रेस नेते भाजपवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांनी ही भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. “योगी, महाराज यांची जागा मठात आहे. ते राजकारणात आले की, देशाचे वाटोळे होते.” अशा शब्दात प्रणिती शिंदे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
सोलापुरात पार पडलेल्या एका कार्यक्रमात बोलताना, “उत्तर प्रदेशची निवडणूक आल्यामुळेच तीन काळे कृषी कायदे रद्द करण्यात आले, याचा पुनरुच्चार करत, वर्षभर शेतकऱ्यांनी लढा दिला, ७०० शेतकऱ्यांचा बळी तुम्ही घेतला आणि मग कायदे रद्द केले, याबद्दल लाज वाटायला हवी.” अशी टीका प्रणिती यांनी भाजपवर केली आहे.
यावेळी, “जे काम करतात, त्यांच्या पाठिशी उभे राहणे महत्त्वाचे आहे. लोकशाही जिवंत ठेवायची असेल, तर कामाला महत्त्व द्या. संविधान जिवंत ठेवायचे असेल, तर कामाला महत्त्व दिले पाहिजे. काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी कधीही जात-पात केली नाही. तुम्ही त्यांना निवडून दिले. कारण ते कामाला प्राधान्य द्यायचे.” असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.
त्याचबरोबर, आपण अजिबात घाबरता कामा नये, आपण कामे केली आहेत. या देशाला बलिदान कुणी दिले असेल तर ते काँग्रेसने दिले आहे. देशात कसोटीच्या पातळीवर उतरुन काँग्रेसनी कामे केली आहेत, तरीही काँग्रेसचा कार्यकर्ता धडाडीने लढताना दिसत नाही, त्यामुळे इथून पुढे आपण कामाच्या पातळीवर राजकीय लढा द्यायचा आहे. असे ही प्रणिती शिंदे म्हणाल्या आहेत.
इतकेच नव्हे तर, काँग्रेस कार्यकर्त्यांनी खचून न जाता कोणत्याही निवडणुकीत पूर्ण ताकदीने लढण्याची गरज आहे. एक दोन पराभव झाले म्हणून काय झाले, यामध्ये ईव्हीएम घोटाळा असू शकतो. मात्र, एक गठ्ठा मतदान केले, तर ईव्हीएम खराब होत नाही, हे मला महिती आहे. असा दावाही त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केला आहे.
दरम्यान पंजाब वगळता इतर चार राज्यात भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. सलग दुसऱ्यांदा योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे दुसरे मुख्यमंत्री होणार आहेत. एकंदरीत या निवडणुकीत काँग्रेसला मोठे अपयश सहन करावे लागले आहे. त्यामुळे सध्या काँग्रेस नेते भाजपवर टीका करताना दिसत आहेत. आता प्रणिती शिंदे यांनी केलेल्या टीकेवर काय राजकीय वादळ उठेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.