तसेच भाजपनेही त्यांच्या पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये प्रवीण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय आणि पाचव्या जागेवर उमा खापरे असणार आहे. या सर्वांना उमेदवारी भेटली पण पंकजा मुंडे यांना उमेदवारी न भेटल्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या त्यांचीच चर्चा सुरु आहे.
भाजपने पंकजा मुंडे यांना विधान परिषदेसाठी संधी दिली नाही, म्हणून समर्थकांमध्ये नाराजी दिसत आहे. पुन्हा एकदा भाजपने विधानपरिषदेसाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना डावलले आलं. यावर आता खुद्द माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे.
ते याबाबत माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं की, ‘पंकजा मुंडे मध्य प्रदेशचा प्रभार सांभळत आहेत. याचबरोबर पंकजाताई भाजपच्या मोठ्या आणि महत्त्वाच्या नेत्या आहेत. त्यांच्याकडे मध्य प्रदेशचा चार्ज आहे,’ असं फडणवीस यांनी सांगितलं आहे.
तसेच फडणवीस पुढे बोलताना म्हंटले की, ‘आता मध्य प्रदेशात निवडणूका आहेत. तिथला प्रभार पंकजा मुंडे सांभाळत आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी करु नका. भाजप हे एक कुटूंब आहे. आम्ही सगळे या कुटूंबाचे सदस्य आहोत,’ असं देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर सांगितले आहे.
दरम्यान, विधान परिषदेच्या दहा जागांसाठीची निवडणूकही तोंडावर आली असल्याने सर्वपक्षीय नेते मंडळींची खलबते सुरू आहेत. विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जूनला निवडणूक होणार आहे. त्यासाठी ९ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे; तर, १० तारखेला राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान होणार आहे.