महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठा संघर्ष सुरू आहे. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी दिवसभर ते गुजरातला होते. त्यानंतर ते आसामला रवाना झाले. त्यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार असल्याचेही म्हटले जात आहे.
एकनाथ शिंदेंसोबत चर्चा करण्यासाठी मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक गेले होते. त्यांची समजूत काढण्यासाठी ते गेले पण त्यांचेही एकनाथ शिंदेनी ऐकले नाही. उलट त्यांनी नार्वेकरांमार्फत उद्धव ठाकरेंकडे संदेश पोहोचवला की, आम्ही दिलेल्या ऑफरवर शिवसेनेने विचार करावा नाहीतर परतीचे दोर कापले जातील.
मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदेंकडे ४० आमदारांचे पाठबळ आहे. असं नाही की या बंडखोरीची माहिती सरकारला नव्हती? याची चाहूल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना काही महिन्यांपुर्वीच लागली होती. शिवसेनेतील नेत्यांमध्ये वाढणारी अस्वस्थता आणि नाराजीबाबत कल्पना आधीच शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना दिली होती.
बंड होण्याचे संकेत शरद पवारांनी आधीच दिले होते. राजकीय सुत्रांनी ही माहिती दिली आहे. स्वत:च्या पक्षातील नेते तर लांबच राहिले पण महाविकास आघाडीचे महत्वाचे नेते शरद पवार यांनाही उद्धव ठाकरे भेटीसाठी वेळ देत नव्हते. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना भेटण्याचा वारंवार प्रयत्न केला होता.
चार ते पाच महिन्यांपुर्वीच शरद पवारांनी बंडखोरीचा इशारा उद्धव ठाकरेंना दिला होता. त्यांनी उद्धव ठाकरेंना सल्ला दिला होता की, स्वत:च्या पक्षातील नेत्यांना तसेच महाविकास आघाडीतील नेत्यांना भेटण्यास सुरूवात करा. पवारांना याची जाणीव झाली होती की, उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांना अवघड जातंय.
त्यानंतर शरद पवारांनी बंडासंदर्भात उद्धव ठाकरेंना इशारा दिला होता. मात्र उद्धव ठाकरेंनी याकडे जास्त लक्ष दिलं नाही. असं अनेकवेळा झालं की, उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना भेटीसाठी वेळच दिला नाही. शरद पवारही मुख्यमंत्री वेळ देत नाहीत यावरून नाराज होते.
उद्धव ठाकरे हे सत्ताधाही पक्षांच्या नेत्यांना भेटण्यासाठी वेळ देत नाहीयेत यावरून शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली होती. यामुळे पुढे संघर्ष होतील असा इशारा शरद पवारांनी दिला होता. महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी उद्धव ठाकरेंची तक्रार शरद पवारांकडे केली होती. चर्चा करताना ते आमचं ऐकूनच घेत नाहीत अशी तक्रार शरद पवारांकडे आली होती. नेत्यांना असं वाटत होतं की सरकारला आता आपली गरज नाही, असं सुत्रांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या
अपहरण झालेले आमदार देशमुख परतले; म्हणाले, ‘मी उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक असून मला बळजबरीने…’
मला बळजबरीने इंजेक्शन दिले, दिडशे पोलिसांनी मारहाण केली; आमदार देशमुखांनी सांगीतला थरारक अनुभव
बंडखोरी शमवायला शिवसेना कृषिमंत्री भुसेंचा उपयोग करणार? शिंदेंसोबतचे ‘ते’ नाते कामी येणार?
शिंदेंच्या बंडामागे ना मुख्यमंत्र्यांवरची नाराजी, ना भाजपचा हात; राग आहे राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्यावर