Pune: पुणे येथील मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत नुकतीच 65 वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली. यामध्ये विविध वजनी गटांसाठी विविध भागांतील पैलवानांनी सहभाग नोंदवला होता. दरम्यान, महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाड या दोघांच्यात झाली.
यामध्ये पुण्याच्या राजगुरूनगर येथील शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाड याला चीतपट करून महाराष्ट्र केसरीची गदा मिळवली आहे. या आनंदाच्या क्षणी शिवराजने “माझ्या आईवडिलांच्या कष्टाचे चीज झाले आहे. मी महाराष्ट्र केसरी जिंकण्यामागे माझ्या आईवडिलांचे कष्ट आहेत.” असे म्हणत आपल्या यशाचे श्रेय आपल्या आईवडिलांना दिले आहे.
तसेच राज्यशासनाने आपल्याला शासकीय नोकरी द्यावी अशी अपेक्षा देखील त्याने यावेळी व्यक्त केली आहे. दरम्यान शिवराजच्या पालकांनी सुद्धा यावेळी माध्यमांना आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याच्या यशावर बोलताना त्याची आई म्हणाली की,” आज त्याने आमची मान अभिमानाने उंचावली आहे.”
तसेच शिवराजच्या या यशाने आमचे १४ वर्षांचे तप पूर्ण झाले आहे. गेली अनेक वर्षे झाले आम्ही यासाठी मेहनत घेत होतो. शेती आणि दुग्धव्यवसायामुळे त्याचा खर्च उचलू शकलो. त्याला इथपर्यंत आणू शकलो. असे म्हणत शिवराजच्या आईने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
शिवराज इथेच न थांबता ऑलम्पिकची देखील तयारी करत आहे. दरम्यान राज्यशासनाने त्याला मदत करावी. तो महाराष्ट्राच्या कुस्तीचे भविष्य असून राज्यशासनाने त्याच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. असे आवाहन शिवराजचे वडील काळूराम राक्षे यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या