Share

ड्रीम बाईक विकत घेण्यासाठी तरुणाने १-१ रुपया जमवला; तीन वर्षांच्या बचतीनंतर शोरुममध्ये गेला अन्…

साधारणत: जेव्हा एखादा ग्राहक कार किंवा बाईक घेण्यासाठी जातो तेव्हा शोरूमचे सर्व कर्मचारी खूश असतात. मात्र, काही वेळा हे ग्राहकांना बघून अडचणीत येतात. तमिळनाडूमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे, ज्यात एक ग्राहक त्याच्या आवडत्या बाईक खरेदीसाठी गेला आणि शोरूमच्या कर्मचाऱ्यांना घाम फुटला. (tamilnadu boy get dream bike bajaj dominar)

झाले असे की त्या तरुणाने २.६ लाख रुपयांची बाईक घेण्यासाठी पैसे तर घेऊन गेला होता, पण ते सर्व पैसे १ रुपयांचे कॉइन होते. तामिळनाडूतील सेलम शहरातील अम्मापेट येथील गांधी मैदान परिसरात राहणाऱ्या या तरुणाचे नाव व्ही भूपती असे आहे. त्याला आपली ड्रीम बाईक घ्यायची होती, त्यासाठी त्याने ते पैसे बचत करुन ठेवले होते.

भूपतीला बजाज डोमिनार ४०० सीसीची बाइक घ्यायची होती. ज्यासाठी तो एक-एक रुपयांची बचत करुन पैसे जमवत होता. बाईकच्या किमतीएवढी नाणी जमा करण्यासाठी त्याला तीन वर्षे लागली. यानंतर तो गेल्या आठवड्यात शनिवारी आपल्या मित्रांसह मिनी व्हॅनमध्ये नाण्यांचे पोते भरून बजाज शोरूमवर पोहोचला.

शोरूमचे व्यवस्थापक महाविक्रांत यांनी सांगितले की, त्यांच्या कर्मचाऱ्यांना नाणी मोजण्यासाठी 10 तासांपेक्षा जास्त वेळ लागला. भूपती हा एका खासगी कंपनीत कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करतो. याशिवाय तो त्याच्या युट्युब चॅनलसाठी व्हिडिओही बनवतो.

भूपतीने सांगितले की, तीन वर्षांपूर्वी जेव्हा त्याला ही बाईक आवडली होती, तेव्हा त्याची किंमत सुमारे २ लाख रुपये होती. मात्र, त्यावेळी त्याच्याकडे तेवढे पैसे नव्हते. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने तेव्हापासून पैसे जोडण्यास सुरुवात केली. तो आपली बचत नाण्यांमध्ये करत होता. याशिवाय तो युट्युब चॅनलची कमाईही बचतीसाठी वापरत होता.

भूपतीच्या म्हणण्यानुसार, नोटा एक रुपयाच्या नाण्यांमध्ये बदलण्यासाठी त्यांना खूप मेहनत घ्यावी लागली. मंदिरे, हॉटेल्स आणि चहाच्या दुकानात जाऊन त्यांनी नोटा बदलून घेतल्या. अशा प्रकारे प्रत्येकी एक रुपयाच्या नाण्यांचा ढीग त्याला मिळाला.

त्यानंतर त्याने त्याच्या आवडीच्या बाईकच्या ऑन-रोड किमतीएवढी रक्कम म्हणजेच २.६ लाख रुपये जमा केले तेव्हा तो बजाजच्या शोरूममध्ये गेला. मात्र, शोरूमचे व्यवस्थापक महाविक्रांत यांनी सुरुवातीला नाण्यांमध्ये पैसे स्वीकारण्यास नकार दिला. नंतर भूपतीने विनवणी केल्यानंतर त्यांनी होकार दिला आणि अशा प्रकारे भूपती अनोख्या पद्धतीने त्याचे स्वप्न साकार करू शकला आहे.

महत्वाच्या बातम्या-
आजची सावित्री! बिबट्याच्या जबड्यातून वाचवला पतीचा जीव; अहमदनगरच्या महिलेचं राज्यभरात होतंय कौतुक
बायकोशी भांडण झाल्यावर नवऱ्याची झाली वाईट अवस्था, विमानतळावर जगतोय ‘असे’ आयुष्य
राजामौलींच्या RRR ने घडवला इतिहास, चौथ्या दिवशीही केली इतक्या कोटींची छप्परफाड कमाई

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now