अटक झाल्यानंतर त्यांच्या भेटीसाठी सोमय्या पोहोचले. त्यावेळी पोलीस ठाण्याबाहेर शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सोमय्या पोलीस ठाण्यातून निघत असताना शिवसैनिकांनी त्यांच्या कारवर हल्ला केला. त्यांच्या कारची काच फुटली आणि सोमय्यांना जखम झाली.
सोमय्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर हा वाद आणखीच चिघळला. तर दुसरीकडे शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याचे समर्थन केलं आहे. सोमय्या काय त्या कारमध्ये जर मोदी जरी असते तरी शिवसैनिकांनी कार फोडली असती असं खळबळजनक विधान दिपाली सय्यद यांनी केलं.
यावर आता भाजपची प्रतिक्रिया आली आहे. सय्यद यांनी भारताच्या पंतप्रधानांबद्दल जे वक्तव्य केलं, त्याबद्दल सय्यद यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपच्या महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सुवर्णा पाटील यांनी केली आहे. याबाबत सातारा शहर पोलीस निरीक्षक यांच्याकडं लेखी निवेदना देखील दिले आहे.
‘सय्यद यांच्यावर राजद्रोह आणि हत्येचा कट रचल्याचा गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे. त्यामुळे आता दिपाली सय्यद यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार असल्याची शक्यता वाढली आहे. तसेच आता सय्यद यांच्या विरोधात भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
पुढे सुवर्णा पाटील म्हणतात, ‘सय्यद यांची क्लिप प्रसारित झाली असून ‘सोमय्या यांच्या जागी मोदी जरी असते तरी त्यांच्यावर हल्ला झाला असता. यावरून हे लक्षात येते की हा हल्ला पूर्वनियोजित आहे. काहीही झालं तरी हल्ला करायचाच, या उद्देशाने त्या ठिकाणी जमाव गोळा केला गेला होता,’ असा आरोप त्यांनी केला.