छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे झालेल्या धर्मसंसदेत कालीचरण महाराज यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्याप्रकरणी कालीचरण महाराजांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक देखील करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह विधान करण्यात आले आहे.
मध्य प्रदेशातील नरसिंहपूर येथे भागवत कथा वाचक तरुण मुरारी बापू यांनी गांधीजींबद्दल आक्षेपार्ह भाषेचा प्रयोग केला आहे. याप्रकरणी तरुण मुरारी बापू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी नरसिंहपूर येथे भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य अतिथी म्हणून तरुण मुरारी बापू यांना बोलवण्यात आले होते.
त्या कार्यक्रमात तरुण मुरारी बापू यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरले. “गांधीजी हे काही महात्मा किंवा राष्ट्रपिता नव्हते. जी व्यक्ती देशाची फाळणी करते ती व्यक्ती राष्ट्रपिता कशी होऊ शकते?”, असा सवाल तरुण मुरारी बापू यांनी उपस्थित केला. तरुण मुरारी बापूंच्या या विधानामुळे एकच खळबळ उडाली आहे.
“महात्मा गांधी यांनी त्यांच्या हयातीत देशाची फाळणी केली. त्यामुळे माझा त्यांना नेहमीच विरोध राहील. देशाची छकले पाडणारी व्यक्ती गांधीजी असोत नाहीतर अन्य कुणी त्याला मी देशद्रोही मानतो”, असे विधानही त्यांनी केले. या भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. पोलिसांनी या गोष्टीची गंभीर दखल घेतली आहे.
नरसिंहपूरचे पोलीस अधिकारी विपुल श्रीवास्तव यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. “सोमवारी भागवत कथेदरम्यान महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह टिपण्णी करण्यात आली आहे. त्याचे रेकॉर्डिंग आम्हाला प्राप्त झाले आहे. त्यानुसार कलम ५०५(२) आणि १५३ (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित व्यक्तीला समन्स बजावण्यात आले आहे व पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे”, असे पोलीस अधिकारी श्रीवास्तव यांनी नमूद केले.
तरुण मुरारी बापूंचे हे वक्तव्य समोर आल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी नरसिंहपूर पोलिसांना निवेदन देऊन आक्षेप नोंदवला आहे. तरुण मुरारी बापूंवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी काँग्रेस नेत्यांनी केली आहे. या प्रकरणाची तात्काळ दखल घेत जिल्हा प्रशासनाने नरसिंहपूर पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दुसरीकडे आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे तरुण मुरारी बापूंनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार नाही, मात्र…; वाचा काय झाला मंत्रिमंडळाचा निर्णय
तिसरी लाट भीषण, 80 लाख लोकांना संसर्गाची भीती
कोरोना झालेली नर्स ४५ दिवसांपासून गेली होती कोमात, व्हायग्राचा एक हेवी डोस देताच आली शुद्धीवर