नवी दिल्ली : भारताचा युवा वेगवान गोलंदाज सिद्धार्थ शर्मा याचे गुरुवारी अनेक अवयव निकामी झाल्याने वडोदरा येथील रुग्णालयात निधन झाले. हिमाचल प्रदेशच्या 28 वर्षीय वेगवान गोलंदाजाच्या निधनाने संपूर्ण भारतीय क्रिकेटला धक्का बसला आहे. सिद्धार्थ शर्मा यांना २ जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुस-याच दिवशी हिमाचल प्रदेशचा बडोदा विरुद्ध रणजी सामना होता. वास्तविक, सिद्धार्थ शर्माने दोन दिवस लघवी करता येत नसल्याची तक्रार केली होती. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सिद्धार्थच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्याने गुरुवारी अखेरचा श्वास घेतला. सिद्धार्थच्या मृत्यूने क्रीडा जगताला धक्का बसला आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी देखील ट्विट करून सिद्धार्थ शर्माला श्रद्धांजली वाहिली आहे. ठाकूर यांनी ट्विट केले की, ‘हिमाचल प्रदेश क्रिकेट संघाचा प्रतिभावान खेळाडू, वेगवान गोलंदाज सिद्धार्थ शर्मा यांच्या निधनाने धक्का बसला आहे. सिद्धार्थ हा आश्वासक खेळाडू होताच, त्याचबरोबर सांघिक भावना ही त्याची खासियत होती.
पुढे ते म्हणाले की, त्यांच्या निधनाने क्रिकेटचे मोठे नुकसान झाले आहे. कुटुंबातील सदस्यांना ईश्वर शक्ती देवो. मला हे दु:ख सहन करण्याची शक्ती दे. ओम शांती. अशा दुखद शब्दांत केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी आपल्या ट्विटमधून दुख व्यक्त केले आहे.
हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे सचिव अवनीश परमार म्हणाले की, राज्य युनिट अद्याप डॉक्टरांच्या अधिकृत अहवालाची वाट पाहत आहे. अवनीश परमार यांनी इंडियन एक्स्प्रेसला तसेच माध्यमांशी बोलताना सिद्धार्थ शर्माच्या मृत्यूबद्दल महत्वाची माहिती दिली.
त्यांनी सांगितले की, ‘आम्हाला सांगण्यात आले की सिद्धार्थ शर्मा मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळे मरण पावला. मात्र याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आम्ही अधिकृत अहवालांची वाट पाहत आहोत. आमचे विचार त्यांचे कुटुंब, मित्र आणि सर्वांसोबत आहेत. सिद्धार्थ शर्मा गुजरातमध्ये आपल्या संघासह रणजी ट्रॉफी दौऱ्यावर होता. गेल्या दोन आठवड्यांपासून तो व्हेंटिलेटरवर होता.
सिद्धार्थ शर्मा अनेक दिवसांपासून आजारी असल्याचे सांगण्यात आले. त्याला बराच काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि त्यांची प्रकृती बरी झाल्याच्या बातम्याही येत होत्या. दरम्यान त्याची प्रकृती अचानक बिघडली आणि 12 जानेवारी रोजी गुजरातमधील वडोदरा येथे रात्री 9 वाजता त्याचे निधन झाले.
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी या धक्कादायक बातमीवर शोक व्यक्त केला आहे. अधिकृत सीएमओ अकाऊंटने ट्विट केले की, ‘मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी सिद्धार्थ शर्मा यांच्या निधनावर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. तो विजय हजारे ट्रॉफी जिंकणाऱ्या हिमाचल प्रदेश संघाचा सदस्य होता आणि राज्याचा स्टार वेगवान गोलंदाज होता.
सिद्धार्थ शर्माची कारकीर्द
सिद्धार्थ शर्माने हिमाचल प्रदेशसाठी 6 प्रथम श्रेणी सामने खेळले आणि 25 बळी घेतले. त्याने ईडन गार्डन्सवर चालू मोसमात बंगालविरुद्ध प्रथमच एका डावात पाच विकेट्स घेतल्या, जिथे त्याने सामन्यात 69/5 आणि 53/2 बळी घेत आपली ताकद दाखवली होती.
सिद्धार्थ शर्माने रणजी ट्रॉफीच्या दोन सामन्यात 12 विकेट घेतल्या. शर्माने 2017-19 रणजी ट्रॉफी हंगामात बंगालविरुद्ध प्रथम श्रेणी पदार्पण केले. त्याने हिमाचल प्रदेशकडून 6 लिस्ट ए आणि एक टी-20 सामनाही खेळला. तो कधीही टीम इंडियासाठी खेळू शकला नाही.
उना येथे जन्मलेल्या सिद्धार्थ शर्माची देशांतर्गत कारकीर्द खूपच लहान होती. 5 वर्षांच्या कालावधीत, त्याने 1 T20, 6 प्रथम श्रेणी सामने आणि 6 लिस्ट ए सामन्यांमध्ये हिमाचल प्रदेशचे प्रतिनिधित्व केले. त्याने रणजी क्रिकेट स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर बंगालविरुद्ध त्याचा शेवटचा सामना झाला होता, जिथे त्याने पहिल्या डावात पाच आणि दुसऱ्या डावात दोन विकेट्स घेतल्या होत्या. त्याने विजय हजारे ट्रॉफी 2021-22 स्पर्धेत पहिला लिस्ट-ए सामना खेळला आणि 6 सामन्यांमध्ये 8 विकेट घेतल्या.