दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेता कमल हसन हे जितके लोकप्रिय आहेत तितकीच लोकप्रिय त्यांची मुलगीही आहे. त्यांची मोठी मुलगी श्रृती हसन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तसेच अनेकदा सोशल मीडियावर ती वेगवेगळ्या पोस्ट करत असते. (shruti hassan talk about her problems)
बऱ्याचदा ती तिच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींबद्दल सांगत असते. श्रृती हसन सध्या तिच्या खाजगी जीवनात आलेल्या अडचणींमध्ये अडकली आहे. सध्या ती कोणत्याही प्रोजेक्टवर काम करत नाही, यामागचं कारण आहे तिची तब्येत.
अलीकडेच श्रृती हासनने PCOS (पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम) आणि एंडोमेट्रिओसिसबद्दल खुलासा केला. ती म्हणतेय की, ती योग्य आहार घेऊन आणि व्यायाम करुन ती शरीराला विश्रांती देण्याचा प्रयत्न करत आहे. या गोष्टी करून ती तिचा आजार बरा करत आहे.
PCOS हा हार्मोनल आजाराचा एक प्रकार आहे, ज्यामध्ये स्त्रीयांच्या अंडाशयाचा आकार मोठा होतो. यामुळे मासिक पाळी खूप असंतुलित होते आणि वंध्यत्वाची समस्या देखील उद्भवते. तसेच यामुळे लठ्ठपणा आणि कधी कधी मधुमेहाच्या समस्येलाही सामोरे जावे लागते.
इंस्टाग्रामवर याच समस्यांबद्दल बोलताना श्रृतीने स्वतःचा एक वर्कआउट व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती जिममध्ये घाम गाळताना दिसत आहे. तसेच, ती सर्वात वाईट हार्मोनल समस्येबद्दल बोलताना दिसत आहे. तसेच श्रृतीने महिलांमध्ये ही समस्या नैसर्गिक असल्याचे मान्य केले आहे.
श्रुती हसन म्हणते, माझ्यासोबत वर्कआउट करा. मी सर्वात वाईट हार्मोनल समस्यांशी झुंज देत आहे, ते आहेत PCOS आणि एंडोमेट्रिओसिस. महिलांना हे माहित असले पाहिजे की याच्याशी लढणे खूप कठीण आहे. कारण या काळात तुमच्या शरीरात हार्मोनल असंतुलित होत असतात.
लठ्ठपणाची समस्याही यामुळे उद्भवते. पण मला असे म्हणायचे आहे की याकडे लढा म्हणून पहा. मी ते स्वीकारले आहे. शरीरातील एक नैसर्गिक हालचाल म्हणून मी ते घेतले आहे. मी योग्य आहार घेते. मी चांगली झोपत आहे आणि माझ्या व्यायामाचा आनंद घेत आहे.