शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या जवळपास ३९ आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. तसेच शिंदे गटासोबत जाणाऱ्या आमदारांची संख्याही वाढताना दिसून येत आहे. (shivsena sanjay raut ultimatem to eknath shinde)
एकनाथ शिंदे यांच्या या मोठ्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकारला धोका निर्माण झाला आहे. सध्याची स्थिती पाहता भविष्यातील अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे. एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील दुरावा वाढत चालला आहे. त्यामुळे ते पुन्हा येतील याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीये.
असे असतानाच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या १५ आमदारांसोबत पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी मोठे खुलासे केले आहे. भाजपकडून आमदारांचे अपहरण करण्यात आले आहे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.
भाजपच्या ताब्यात असलेल्या २१ आमदारांचा आमच्याशी संपर्क झालेला आहे. ज्यादिवशी ते मुंबईला येतील तेव्हा २१ आमदार शिवसेनेसोबत असतील. सर्वांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. तर भाजपने नेलेले आमदार नितीन देशमुख आणि कैलास पाटील परत आले आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
तसेच गेलेल्या सर्व आमदारांनी मुंबईला यावं. त्यांनी चोवीस तासात मुंबईला यावं. ते जर आले तर त्यांची जी भूमिका आहे, ती जाणून घेऊ. त्यांची भूमिका स्वीकारण्याचा विचार करु, पण त्यांनी चोवीस तासात मुंबईत येण्याची हिंमत दाखवावी, असा अल्टिमेटम संजय राऊतांनी बंडखोर आमदारांना दिला आहे.
दरम्यान, या पत्रकार परिषदेत कैलास पाटील आणि नितीन देशमुख यांनी त्यांच्यासोबत नक्की काय झालं? त्याबद्दल सांगितलं आहे. मला गुजरातला जबरदस्ती नेण्यात आले होते. पण तिथून मी कशीतरी सुटका करुन पळून आलो, असे नितीन देशमुख यांनी म्हटले आहे. तसेच काही आमदार पुन्हा शिवसेनेत येण्यासाठी तयार असल्याचेही नितीन देशमुख यांनी म्हटले आहे.