सोमय्या यांच्यावर खार पोलीस स्थानकाबाहेर झालेल्या हल्लानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावर राऊत यांनी भाष्य केलं असून सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे. याबाबत संजय राऊत मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
“एक माथेफिरू सध्या ओठाच्या खाली टोमॅटो सॉस लावून जखमी झाल्याचा दावा करत जगभर फिरत आहे आणि राष्ट्रपती राजवटीची मागणी करत आहेत, अशा व्यक्तीच्या मूर्खपणाकडे दुर्लक्ष केलं पाहिजे”, असा खोचक टोला संजय राऊत यांनी सोमय्यांना लगावला आहे.
“परत सत्तेत येऊ शकले नाहीत याची अस्वस्थता असून पुढील २५ वर्ष पुन्हा येण्याची शक्यताही नाही. अशांत मन असेल तर त्यांनी आपल्या देवघरात हनुमान चालिसा वाचून मन शांत करावं,” असा खोचक सल्ला यावेळी बोलताना राऊत यांनी भाजपा नेत्यांना दिला.
पुढे बोलताना राऊत म्हणाले, ‘विरोधी पक्ष सतत काही ना काही खाजवत राहतात. त्यामुळे एक दिवस त्यांची चामडी फाटणार आहे. भोंग्यांसंदर्भात केंद्राने सर्वसमावेशक भूमिका जाहीर करावी. विरोधी पक्षांना अराजक माजवायचं आहे”, असं म्हणतं राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
वाचा नेमकं काय घडलं.. दोन दिवसांपूर्वी माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना भेटण्यासाठी खार पोलीस ठाण्यात जात असताना, किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाला. या हल्ल्यात त्यांच्या हनुवटीला किरकोळ दुखापत झाली.या घटनेचा व्हिडिओदेखील चांगलाच व्हायरल झाला होता.
हल्ल्यानंतर समोर आलेल्या दृश्यांमध्ये किरीट सोमय्या यांना हनुवाटीतून रक्त येत असल्याचं दिसून आलं होतं. मात्र, ही जखम बनावट असल्याची शंका पोलिसांकडून उपस्थित करण्यात आली आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर भाजप – शिवसेना पुन्हा आमनेसामने आली आहे.