गेल्या सहा दिवसांपासून शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट आसाममधील गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हाॉटेलमध्ये थांबले आहेत. बंडखोर नेते एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबतचे ४० बंडखोर आमदार तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असे शिवसेनेत उघड दोन गट पडले आहेत.
या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झालं आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहेत, अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगत आहे.
अशातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना कार्यकर्त्यांना संबोधित करताना बंडखोर आमदारांचा उल्लेख डुकरं केला आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. ‘गुवाहाटीत डुकरं फार, त्यात इकडची चाळीस डुकरं तिकडं गेली,’ असं राऊत यांनी म्हंटलं आहे.
वाचा सविस्तर नेमकं राऊत यांनी काय म्हटलं आहे? बंडखोर आमदारांना लक्ष करताना राऊत यांची जीभ घसरली. ‘गुवाहाटीत डुकरं फार आहेत, त्यात इकडचे चाळीस डुकरं तिकडं गेली, हिंमत होती तर पाय लावून पळून का गेला?,’ असा खोचक सवाल राऊत यांना उपस्थित केला.
पुढे बोलताना राऊत म्हणाले, ‘गुवाहतीत काय आहे? गुवाहाती कामाक्षी देवीचं मंदिर आहे. तिकडे रेड्यांचा बळी देतात. डुकरांचा बळी देत नाही. डुकरांचा बळी आपल्याला आपल्या राज्यात द्यायचा आहे. असंख्य देव देवता आपल्याकडे आहेत. ज्यांना अशा नैवध्य लागतो असा, असं राऊतांनी म्हंटलं आहे.
दरम्यान, रोखठोकमधून देखील राऊत यांनी निशाणा साधला आहे. “शिंदे व चाळीस आमदारांचे बंड म्हणजे भूकंप नव्हे. अशा अनेक भूकंपाच्या हादऱ्यातून शिवसेनेचे अस्तित्व टिकून आहे. आमदार येतात व जातात. पक्ष संघटन ठाम असते. शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. ते नक्कीच झाले असते, पण त्यांचे मुख्यमंत्रीपद कोणी रोखले?,” असं त्यांनी म्हंटलं आहे.