संजय राऊतांच्या घरात ईडीला मिळालेल्या लाखो रूपयांशी निघाले एकनाथ शिंदेचे कनेक्शन; राजकारणात खळबळ

रविवारी रात्री उशीरा पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी काल शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलं. त्यांना ईडीने ताब्यात घेतल्यानंतर शिवसैनिक कमालीचे आक्रमक झाले आहेत. शिवसैनिकांनी या विरोधात आंदोलन सुरू केलं.

रविवारी सकाळी सात वाजता ईडीची टीम राऊत यांच्या घरी पोहचली आणि त्यानंतर साडे नऊ तासांच्या चौकशीनंतर राऊत यांना त्यांच्या भांडुपमधील मैत्री या निवासस्थानातून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

तर दुसरीकडे ईडीला राऊत यांच्या घरी सापडलेल्या रोख रक्कमेसंदर्भातही एक मोठा खुलासा समोर आला आहे. राऊतांच्या घरात सापडलेल्या ११ लाख रुपयांच्या रोख रकमेपैकी १० लाख रुपयांच्या एका बंडलावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव आढळून आल्याचे सांगितले जात आहे.

यामुळे आता या प्रकरणाला वेगळच वळण लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नऊ तास सुरु असणाऱ्या या चौकशी आणि छापेमारीदरम्यान राऊत यांच्या घरी तब्बल साडेअकरा लाखांची रोख रक्कम सापडली. यामुळे आणखीच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १० लाखांची रक्कम असणाऱ्या पाकिटावर राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे. याचबरोबर उरलेले दीड लाख रुपये हे घरातील खर्चासाठी ठेवण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतर हे पैसे ईडीने जप्त केले आहेत.

दरम्यान, शिंदे यांना राऊत यांच्या घरी सापडलेल्या १० लाखांच्या बंडलावर ‘एकनाथ शिंदे अयोध्या’ असे नाव असल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. राऊतांच्या घरात सापडलेल्या रकमेवर माझे नाव असेल तर ते राऊतांनाच विचारा, असे मुख्यमंत्री म्हणाले.