एकनाथ शिंदे यांचं सरकार आज बहुमत चाचणीला सामोरे गेलं. आज एकनाथ शिंदे सरकारनं आपली दुसरी परीक्षाही पास केली आहे. विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीच्या लढाईत शिंदे-फडणवीस सरकारनं बाजी मारली आहे. यामुळे सध्या शिंदे गट आणि भाजपमध्ये आनंदाच वातावरण आहे.
शिंदे-भाजप सरकारने बहुमताचा प्रस्ताव जिंकला. त्यानंतर सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक नेत्यांची भाषणे झाली. शिवसेनेचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला.
यावेळी बोलताना जाधव यांनी म्हंटलं आहे की, ‘एकनाथ शिंदेजी हे तुम्हाला लढवत आहेत. रक्तपात शिवसेनेचा होईल. शिवसैनिक घायाळ होतील. २५ वर्षांचा इतिहास पाहिला तर शिवसेना संपवणं हा एककलमी कार्यक्रम आहे. तुमच्यावर यांचं प्रेम नाही तुम्ही मुख्यमंत्री झालात याचा आनंद आहे.’
मात्र शिवसेना वाचवण्यासाठी दोन पावलं मागे घ्या. जर शिवसेना फुटू दिली नाहीत तर महाराष्ट्र डोक्यावर घेऊन नाचेल असंही जाधव म्हणाले. संजय राठोड यांचं मंत्रिपद घालवण्यासाठी तुम्ही आंदोलन केलं. संजय राठोड यांचं काय करणार आहात? यामिनी जाधव यांची चौकशी लावली, आज त्यांनाचा सुरक्षा दिली जात आहे असंही भास्कर जाधव म्हणाले.
दरम्यान ‘मी गेले ८ दिवस झोपलेलो नाही. मी कधी विचलित, अस्वस्थ होत नाही, पण चेहऱ्यावर लपवू शकत नाहीत. एकनाथ शिंदे आजही मी शिवसेनेचा, बाळासाहेबांचा शिवसैनिक, आनंद दिघेंचा वारसदार असल्याचं सांगत आहेत. एकनाथराव तुमच्यावर आता खूप मोठी जबाबदारी असल्याच जाधव यांनी म्हंटलं आहे.
‘महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून प्रत्येक गोष्ट, चाल, कृती सरकार उलथवून टाकण्यासाठी होती. कधी कोणाच्या हातात हनुमान चालिसा दिली, भोंगा दिला, नुपूर शर्मा, कंगना आणलीत. पण सत्ता उलटली नाही,’ असं म्हणत जाधव यांनी भाजप नेत्यांना सुनावलं.