अखेर एकनाथ शिंदे यांचं बंड यशस्वी झालं आहे. दहा दिवसांनी अखेर अल्पमतात आलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड करत ते आता राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहेत. शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात भूकंप झाला होता.
गुरुवारी शिदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची घेतली. तर आता तब्बल 11 दिवसांनी बंडखोर आमदारांचे मुंबईत आगमन झाले आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणत पोलिस तैनात करण्यात आले आहेत. विशेष बाब म्हणजे या आमदारांच्या बसमध्ये खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत.
दोन तासांपूर्वीच 45 प्रवाशांची आसन क्षमता असणारी ही गाडी विमानतळावर दाखल झाली होती. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना हॉटेल प्रेसीडेंटमध्ये आणले जाणार आहे. बंडखोर आमदार मुंबईत आल्यानंतर भाजपाच्या वरच्या फळीतील नेत्यांसोबत त्यांची बैठक असणार आहे.
विशेष अधिवेशन बोलावण्यात आले असून त्याला हे सर्व आमदार हजर राहणार आहेत. विशेष बाब म्हणजे, हे बंडखोर आमदार ज्या मार्गाने जात आहेत, त्या मार्गावर विशेष कॉरिडॉर (Special corridor) तयार करण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली आहे.
दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधीमंडळाचे पक्ष प्रतोद सुनील प्रभू यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदारांना व्हीप जारी केला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांनाच सर्वांनी मतदान करावं, असा आदेश आमदारांना देण्यात आला आहे.
तर शिवसेनेच्या या निर्णयावर एकनाथ शिंदे यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिलेली आहे. आमच्याकडे बहुमत असल्याने सुनील प्रभू यांनी जारी केलेला व्हीप आम्हाला लागू होत नाही, असं शिंदे यांनी म्हंटलं आहे. सध्या राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. शिवसेना देखील आक्रमक झाली आहे.