फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंडनंतर प्रेक्षक शेर शिवराज या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. हा चित्रपट रिलीज होताच या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी नेहमीप्रमाणे प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली. शेर शिवराज हा चित्रपट हाऊसफुल चालू आहे.
चित्रपटाचे ५०० हून अधिक शोज हे हाऊसफुल आहेत. रिलीजनंतर पहिल्या तीन दिवसांतच चित्रपटाने ४.२० कोटींचा गल्ला जमावला आहे. तरण आदर्श यांनी या चित्रपटाच्या कमाईचे आकडे ट्विटरवर शेअर केले आहेत. ते एक ट्रेल ऍनलिस्ट आहेत. पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी या चित्रपटाने १.०५ कोटींची जबरदस्त कमाई केली होती.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी या चित्रपटाने १.४५ कोटींची कमाई केली होती जी पहिल्या दिवसापेक्षा जास्त होती. त्यानंतर रविवारी या चित्रपटाने १.७० कोटींची कमाई करत उंचाकी आकडा गाठला होता. अशी सगळ्या दिवसांची जर आपण आकडेवारी मोजली तर सगळी मिळून या चित्रपटाने ४.२० कोटींची कमाई केली आहे.
केजीएफ २, जर्सीसारखे चित्रपट समोर असताना शेर शिवराज या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. दिग्पाल लांजेकर यांचे अष्टकातील शेर शिवराज हे चौथे चित्रपुष्प आहे. फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंडनंतर या चित्रपटाच्या यशानंतर आता शेर शिवराजही हिट चालला आहे.
शेर शिवराज या चित्रपटात अफजल खानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी कसा केला हे दाखविले आहे. त्यामध्ये महाराजांचं युद्धकौशल्य दाखवण्यात आलं आहे. महाराजांनी त्या वेळी अवलंबलेल्या अनेक गोष्टींवर या चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला आहे. दरम्यान, पावनखिंड या चित्रपटालाही उदंड प्रतिसाद मिळाला होता.
या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोट्यावधींची कमाई केली होती. शेर शिवराज या चित्रपटात चिन्मय मांडलेकर मुख्य भुमिकेत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. अफजल खानची भूमिका ही बॉलिवूड स्टार मुकेश ऋषी यांनी साकारली आहे. मुकेश ऋषी हे खलनायकाची भूमिका साकारण्यासाठी ओळखले जातात.