राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. बुधवारी दुपारी ४ वाजताच्य सुमारास त्यांनी राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून रुपाली चाकणकर राजीनामा देणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.
त्यांच्याकडे महिला आयोगाचं अध्यक्षपदसुद्धा आहे. आता रुपाली चाकणकरांनी राजीनामा दिल्यानंतर पुढील महिला प्रदेशाध्यक्षपद कोणाकडे जाईल याची चर्चा रंगली आहे. लवकरच राष्ट्रवादी हा निर्णय घेणार आहे. रुपाली चाकणकर यांची काही दिवसांपुर्वीच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
एक व्यक्ती एकच पद सांभाळू शकतो त्यामुळे त्यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. २०१९ साली रुपाली चाकणकर यांच्याकडे या पदाची जबाबदारी आली होती. त्यावेळी चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन पक्षाला रामराम ठोकला होता.
त्यानंतर रुपाली चाकणकर यांना महिला प्रदेशाध्यक्षपद देण्यात आले होते. चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी रुपाली चाकणकर यांनी वेळोवेळी राष्ट्रवादीची साथ देत भाजपवर निशाणा साधला होता. भाजपकडून चित्रा वाघ आणि राष्ट्रवादीकडून रुपाली चाकणकर यांच्यामध्ये वारंवार वाद झालेले आपण पाहिलं असेल.
रुपाली चाकणकर म्हणाल्या की, २७ जुलै २०१९ रोजी मला राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार मिळाला. जुलै महिन्यात पदभार स्वीकारला आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्यात सर्वत्र पुरस्थिती होती. त्याच काळात अनेक लोक आपल्या पक्षाला सोडून जात होते. पहिल्या आढावा बैठकीत पुरस्थिती होती अशा वेळी महिला आपल्या बैठकीत कशा येणार असा प्रश्न उभा राहिला होता.
पुढे त्या म्हणाल्या की, आपल्या कार्याचा अनुभव असल्याने मी आढावा बैठक घेतली होती. रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्याने आता या पदावर कोणाची नियुक्ती होणार? असा प्रश्न उभा राहिला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर रुपाली चाकणकरांची ऑक्टोबर २०२१ रोजी नियुक्ती झाली होती. त्यानंतर त्या राजीनामा देतील अशा चर्चांना उधाण आले होते.
महत्वाच्या बातम्या