सध्या राजकीय वर्तुळात सध्या आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन आठवडा उलटला. मात्र अद्याप शिंदे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार झालेला नाहीये. यावरून विरोधकांनी देखील शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.
मंत्रीमंडळ विस्तारच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय वर्तुळात भेटी गाठींचे सत्र सुरू आहे. नेत्यांकडून अनेक दावे – प्रतिदावे करण्यात येत आहेत. अशातच आरपीआयचे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एकनाथ शिंदे गटाला मोठी ऑफर दिली आहे.
शिंदे गटानं आमच्या पक्षात विलीन व्हायचा निर्णय घेतल्यास स्वागत करु, असं रामदास आठवले यांनी म्हटलंय आहे. सध्या आठवले यांनी दिलेल्या ऑफरची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. वाचा सविस्तर नेमकं रामदास आठवलेंनी काय म्हंटलं आहे.
याबाबत माध्यमांशी बोलताना आठवले यांनी म्हंटलं आहे की, मुख्यमंत्री माझ्या पक्षात येणार असतील तर मला आनंद होईल. मुख्यमंत्री, ५० आमदार, नगरसेवक आणि महाराष्ट्रातील शिवसैनिक आरपीआयमध्ये आले तर मी त्यांचं टेबलावर उभं राहून स्वागत करेन, असं आठवले यांनी म्हटलं.
दरम्यान, आठवले यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. काल आठवले यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. दरम्यान, आरपीआय मार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
विशेष बाब म्हणजे पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना आठवले म्हणाले, येत्या 2 ऑगस्ट रोजी तालकटोरा स्टेडियममध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.