हनुमान चालिसाच्या पठणावरून मुंबईत वाद सुरूच आहे. खासदार नवनीत राणाही या वादात अडकल्या आहेत. शनिवारी नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली, त्यानंतर आज त्यांना वांद्रे न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना पुढील सुनवाईपर्यंत कारागृहात पाठवण्याचे आदेश दिले आहेत.
नवनीत राणा यांना भायखळा तुरूंगात तर आमदार रवी राणा यांना ऑर्थर रोड कारागृहात ठेवण्यात येणार आहे. नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचे पठण करणार असल्याचे सांगितले होते. त्यासाठी त्यांनी शनिवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत वेळ दिला होता.
मात्र तत्पूर्वी शनिवारी शिवसेनेचे कार्यकर्ते खार येथील त्यांच्या घरी जमले होते, त्यामुळे दोघेही घराबाहेर पडू शकले नाही. यानंतर सायंकाळी मुंबई पोलिसांनी त्यांना पतीसह अटक केली. कलम 153A म्हणजेच धर्माच्या आधारे दोन गटांमध्ये वैर वाढवल्याबद्दल पोलिसांनी शनिवारी खासदार नवनीत आणि रवी राणा यांना अटक केली.
रात्री साडेपाचच्या सुमारास राणा दाम्पत्याला घेऊन पोलीस खार पोलीस ठाण्यात पोहोचले. मात्र, रात्री उशिरा त्यांना सांताक्रूझ पोलीस ठाण्यात नेण्यात आले. दोघांना रविवारी वांद्रे न्यायालयात हजर करण्यात आले. दोघांच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली होती ती फेटाळण्यात आली. न्यायालयाने दोघांना 6 मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले.
जामिनावर 29 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.नवनीत राणांविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध आयपीसी कलम 353 अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. नवनीत राणा यांच्यावर सरकारी कामात हस्तक्षेप केल्याचा आरोप आहे. तत्पूर्वी, शनिवारी दिवसभराच्या गदारोळानंतर पोलिसांनी नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना अटक केली.
राणा दाम्पत्यावर एफआयआर दाखल झाल्यानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, 2 घटना घडल्या आहेत. एक, हनुमान चालिसाच्या निमित्ताने दंगल भडकवण्याचा प्रयत्न झाला. यावर आवश्यक ती कार्यवाही करण्यात आली आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर काल रात्रीच्या घटनेवरही कारवाई करण्यात आली आहे. या बाबतीत दूरदृष्टी दाखवण्याची गरज आहे.
दिलीप वळसे पाटील पुढे म्हणाले की, भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर दगडफेक करण्यात आली, हे कोणी केले याचा तपास सुरू आहे. पोलिसांना वेगळे आदेश देण्याची गरज नाही, ते आपले काम चोख बजावत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, असे वातावरण राज्यात निर्माण केले जात आहे असा आरोपही त्यांनी केला.