सध्या राज्यसभा निवडणुकीवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागा लवकरच रिक्त होत आहेत. या जागांसाठी १० जून रोजी निवडणूक होणार आहे. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोडेबाजार टाळण्यासाठी महाविकास आघाडी सरकार आणि भारतीय जनता पार्टीकडून मोठे प्रयत्न केले जात आहे.
सहाव्या उमेदवाराच्या विजयासाठी भाजपा तसेच महाविकास आघाडीचे बडे नेते छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांचे मन वळवण्याचे प्रयत्न करताना दिसत आहेत. तसेच स्वपक्षातील आमदारांनाही मुंबईत येण्याचे आदेश भाजपा आणि महाविकास आघाडीने आदेश दिले आहेत.
तसेच घोडेबाजार टाळता यावा म्हणून भाजपाने त्यांच्या आमदारांना हॉटेल ताजमध्ये ठेवले आहे. तर महाविकास आघाडीच्या आमदारांच्या राहण्याची व्यवस्था हॉटेल ट्रायडेन्टमध्ये करण्यात आली आहे. याच सर्व राजकीय घडामोडींवर मनसेचे एकमेक आमदार राजू पाटील यांनी फेसबुक पोस्ट करत निशाणा साधला आहे.
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजू पाटील यांनी सूचक अशी फेसबुक पोस्ट केली आहे. आपल्या पोस्टमध्ये ते म्हणतात, ‘राज्यसभा, निवडणूक, मतदान, आमदार, फोडाफोडी, पळवापळव, जमवाजमव, धडपड, धरपकड, धावपळ, आकडेमोड, हॉटेल बुकिंग, धाकधूक, दुसरं हॉटेल, पाण्यासारखा पैसा, जनतेचा सगळा, आपलेच, आमदार, अविश्वास, दमदार, फुटायची भीती, बेकार मती, भ्रष्ट नीती !.’
दरम्यान, सध्या राजू पाटील यांची ही फेसबुक पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे. याचबरोबर सहावा उमेदवार निवडून येण्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडीत चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. तसेच सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात असल्यामुळे आमदारांचा भावही वधारल्याचे दिसून येत आहे.
यामुळे मनसेचे आमदार राजू पाटील हे चांगलेच चर्चेत आहेत. कारण त्यांचे एक मत सुद्धा मोलाचे ठरणार आहे. त्यामुळे हे मत भाजप खेचणार की ठाण्यातील शिवसेनेचा बडा नेता? याबाबत अजूनही स्पष्ट झालेले नाही. सध्या भाजप आणि मनसेत जवळीक वाढली असून महापालिकेत ते युती करु शकतात, अशी चर्चा आहे. त्यामुळे भाजपला मनसेचे हे एक मिळू शकते, अशी चर्चा आहे. पण अद्याप मनसेने यावर आपली भूमिका अजून स्पष्ट केलेली नाहीये.