आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, सत्ता येत जात असते, उद्धव ठाकरे तुम्ही..; राज ठाकरेंचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. यावेळी राज ठाकरेंनी ट्विटरवर एक पोस्ट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला आहे. राज्य सरकारने मनसैनिकांवर कारवाई केल्यामुळे राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहीले आहे. (raj thackeray letter to uddhav thackeray)

सत्तेचा ताम्रपट घेऊन जन्माला कोणीच येत नाही. उद्धव ठाकरे तुम्हीही नाही, असे राज ठाकरेंनी पत्रात म्हटले आहे. तसेच ते संदीप देशपांडे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना असे शोधत हे जसे ते पाकिस्तानातून आलेले अतिरेकी आहे, असा टोलाही राज ठाकरेंनी ठाकरे सरकारला लगावला आहे.

राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत- जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही, असे ट्विट राज ठाकरेंनी केले आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्रही शेअर केले आहे.

राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र-
सर्व देशबांधवांना मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी मी पत्राद्वारे आवाहन केल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकार बेभान होऊन अंगात आल्यासारखं वागत आहे. देशाचे सर्वोच्च न्यायालय आणि विविध राज्यातील उच्च न्यायालय यांनी दिलेल्या निर्णयांची अंमलबजावणी व्हावी यासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी दि. ४ मे रोजी भोंगे उतरवा’ आंदोलन सुरू करण्यापूर्वीच ठिकठिकाणी त्यांची धरपकड करण्यात आली.

तब्बल २८ हजार महाराष्ट्र सैनिकांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या, हजारोंना तडीपार केलं आणि अनेकांना तुरुंगात डांबलं. कशासाठी? ध्वनिप्रदूषण करणारे, लोकांना त्रास देणारे मशिदींवरचे अनधिकृत भोंगे उतरवले जाऊ नयेत यासाठी !

गेला आठवडाभर महाराष्ट्र सैनिकांची दडपणूक करण्यासाठी राज्य सरकार ज्या पद्धतीने पोलीस बळाचा वापर करत आहे ते पाहता मला प्रश्न पडलाय की; मशिदीमध्ये लपवून ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी अशी ‘धरपकड मोहीम’ राज्य सरकारने किंवा पोलिसांनी कधी राबवली होती का?

आमचा संदीप देशपांडे आणि इतरही अनेक कार्यकर्त्यांना पोलीस असे काही शोधत आहेत, जणू ते पाकिस्तानातून आलेले अतिरेकी किंवा निजामाच्या हैद्राबाद संस्थानातले ‘रझाकार आहेत! अर्थात, महाराष्ट्र सैनिकांविरोधात ही अत्याचारी, दमनकारी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना कुणी दिलेत हे समस्त मराठीजन, तमाम हिंदूजन उघड्या डोळ्यांनी बघत आहेत. राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे; आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही!

महत्वाच्या बातम्या-
भाजप खासदार ब्रिजभूषण सिंगांचे खळबळजनक वक्तव्य; म्हणाले, बाळासाहेबांनी उत्तर प्रदेशची…
नव्या ‘डिव्हिलियर्स’चा आयपीएलमध्ये दबदबा; लोक म्हणाले, ‘हा कॉमेंटेटर भारताला वर्ल्डकप जिंकून देणार’
पुन्हा ‘तो’ येतोय! महाराष्ट्रात जून, जुलैमध्ये करोनाची चौथी लाट?; राजेश टोपेंचं मोठं विधान