अशातच उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेच्या निमित्ताने मराठवाड्यामध्ये जागर शिवसेनेचा यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर हे लातूर जिल्ह्यात आले होते. ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते हलगरा येथील शाखा उद्घाटन करण्यात आले. निलंगा तालुक्यातील हलगरा येथे त्यांची सभा झाली.
यावेळी शिवसेना मेळाव्यात बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल चढवला. केंद्रातील मोदी सरकार हे आवळा देऊन कोहळा काढणारे असल्याची जहरी टीकाही खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे. यामुळे आता शिवसेना – भाजपमधील वाद आणखी वाढणार असल्याच बोललं जातं आहे.
यावेळी बोलताना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केंद्र सरकारला लक्ष करताना म्हंटले आहे की, ‘शेतकऱ्याच्या खात्यावर दोन हजार रुपये टाकून शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि शेतकरीही मोदीचे दोन हजार आले म्हणून गावभर सांगत फिरतो, अशा शब्दात ओमराजे निंबाळकर यांनी निशाणा साधला आहे.
दरम्यान, ‘शेतकऱ्याचे सोयाबीन येण्याच्या अगोदर सोयाबीनचा भाव दहा हजार रुपयांपर्यंत असतो. मात्र जेव्हा शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात येण्यास सुरुवात होते तेव्हा तो भाव चार हजार ते साडेचार हजार रुपयापर्यंत खाली आणला जातो. यामुळे दोन एकरवाल्या शेतकऱ्यांना सुद्धा लाख रुपयांचा फटका सहज बसतो, असं ते म्हणाले.
याचबरोबर ‘मोदी सरकार हे एकीकडे शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान करते. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना दोन हजारात खुश करते म्हणून आवळा देऊन कोहळा काढणारे हे सरकार, असल्याचा खोचक टोला खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केंद्र सरकारला लगावला आहे.