एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती. अल्पमतात आल्यामुळे अखेर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आहे. पण महाविकास आघाडी सरकार कोसळण्याआधी उद्धव ठाकरे यांनी एक मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती.
मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीत काही महत्वाचे निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतले होते. त्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीन महत्वाचे निर्णय घेतले आहे. त्यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर असे केले आहे. गेल्या काही वर्षांपासून औरंगाबाद शहराचे नामांतर संभाजीनगर असे करण्यात यावे अशी मागणी केली जात होती.
त्याचबरोबर उद्धव ठाकरेंनी उस्मानाबाद व नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. मात्र पूर्वी याच नामांतराला राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे नेते तीव्र विरोध करत होते. मात्र एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळणार होतं.
यामुळे शिवसेना अडचणीत सापडले होते. याच कारणामुळे कदाचित राष्ट्रवादी, कॉंग्रेस या दोन्ही मित्रपक्षांनी नामांतराला विरोध केला नसावा, असं बोललं जातं आहे. मात्र आता विरोध न केल्याने कॉंग्रेस नेते अडचणीत सापडल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रकरणी बाळासाहेब थोरात यांना दिल्लीहून खुलासा करण्यास सांगण्यात आले आहे.
दरम्यान, दिल्लीतील कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी थोरात यांच्याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत कॉंग्रेसने नामांतराला विरोध का केला नाही ? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. याबाबत खुलासा करण्याचे आदेश देखील कॉंग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांनी थोरात यांना दिला आहे.
तर दुसरीकडे थोरातांनी यापूर्वी काहीशी वेगळी भूमिका घेतली होती. नामांतर हा विषय आमच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही. त्यामुळे जेव्हा हा विषय मंत्रीमंडळ बैठकीत येईल तेव्हा आम्ही त्याला कडाडून विरोध करू, अशी भूमिका देखील थोरांतानी मागील काळात घेतली होती.