राज्याच्या राजकीय वर्तुळात भेटी गाठींचे सत्र अजूनही सुरू आहे. खुद्द राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जोमाने कामाला लागले आहेत. अलीकडे शिंदे यांनी शिवसेनेच्या ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे.
मुख्यमंत्री यांनी सुरुवातीला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डाके यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचीही सदिच्छा भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चाना उधाण आलं आहे.
विशेष बाब म्हणजे, गेल्याच आठवड्यात शिंदे यांनी खासदार गजानन किर्तीकरांची (Gajanan Kirtikar) त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. याचबरोबर बाळासाहेब ठाकरेंशी एकनिष्ठ असलेल्या ज्येष्ठ शिवसेना नेत्यांना आपल्या गटात सामील करण्यासाठी शिंदेंनी खास रणनीती आखलीय.
आणि त्याच रणनीतीनुसार शिंदेंनी गाठीभेटी घ्यायला सुरूवात केली असल्याच राजकीय वर्तुळात बोललं जातं आहे. मनोहर जोशी यांची भेट घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एक मोठं सूचक वक्तव्यही केले आहे. शिंदे यांच्या व्यक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दरम्यान, या भेटीबद्दल बोलताना शिंदे यांनी म्हंटलं आहे की, ‘मनोहर जोशी यांच्या तब्येतीची आस्थेने विचारपूस केली. त्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा नेहमीच कामाला येईल. आज मनोहर जोशी यांनी मला ६० योजनांचे एक पुस्तक दिले, असे शिंदे यांनी सांगितले.
विशेष बाब म्हणजे, या पुस्तिकेत शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळातील ६० घोषणांचा समावेश आहे. जोशी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चर्चा करून या घोषणा निश्चित केल्या होत्या. यापैकी अनेक घोषणा उत्तम असून आम्ही त्यांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करु, शिंदे यांनी सांगितलं आहे.