मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चार जागेसाठी नुकतीच निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीतीत भाजपचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनेलचा दणदणीत विजय झाला. या निवडणुकीत प्रवीण दरेकर यांनी मजूर प्रवर्गातून अर्ज भरला होता. यावर आता आक्षेप घेण्यात आला आहे. त्याबद्दल तक्रार देखील दाखल केली होती. सहकार विभागाने या तक्रारीची दखल घेत प्रवीण दरेकर मजूर नसल्याचे सांगितले असून, त्यांना अपात्र ठरवले आहे.
प्रविण दरेकर मजूर नसल्याचे कारण सहकार विभागाने देत त्यांचा संचालक पदासाठीचा दावा फेटाळला आहे. त्यामुळे प्रविण दरेकरांसह भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे दरेकरांच्या समर्थकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. दरेकरांनी मजूर प्रवर्गातूनच अर्ज भरला होता. ते मजूर संस्थेचे प्रतिनिधी म्हणून निवडून आले होते. त्यामुळे विरोधकांनी त्यावर आक्षेप घेत तक्रार दाखल केली होती.
या अनुषंगाने सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दरेकरांना नोटीस पाठवली होती. मजूर म्हणून आपल्याला का घोषित करु नये असे नोटीसमध्ये सहकार विभागाकडून म्हटले होते. यासाठी दरेकरांना ३१ डिसेंबरपर्यंतचा वेळ देखील दिला होता. परंतु, दरेकरांचे यावर काहीच उत्तर आले नाही. त्यामुळे आता, चौकशीनंतर प्रवीण दरेकर मजूर नसल्याचे सहकार विभागाने स्पष्ट केले आहे. म्हणून त्यांचे सदस्यत्व अपात्र असल्याचे सहकार विभागाने स्पष्ट केले आहे.
या निमित्ताने १९९७ पासून मुंबै बँकेवर याच प्रवर्गातून संचालक बनलेल्या दरेकर यांनी मजूर नसतानाही निवडणूक लढवून शासनाची फसवणूक केल्याचेही उघड झाले. आमदार म्हणून निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील कोटय़वधींची मालमत्ता तसेच व्यावसायिक म्हणून केलेली नोंद आणि आमदार- विरोधी पक्षनेते म्हणून अडीच लाख रुपये मानधन मिळविणारी व्यक्ती मजूर असूच शकत नाही हेही यावेळी स्पष्ट झाले.
या निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन्ही पक्षांनी मिळून सहकार पॅनल स्थापन केले होते. २१ जागांपैकी १७ जागा बिनविरोध निवडून आल्या. उर्वरित चार जागांवर शिवसेना बंडखोरांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. या चार जागांवरही सहकार पॅनलचा विजय झाला होता. त्यामुळे प्रविण दरेकर यांचे संचालक पद कायम राहणार होते.
नवाब मलिकांच्या निशाण्यावर भाजप नेते प्रवीण दरेकर असल्याचे म्हटले गेले होते. मुंबै बँकेच्या घोटाळ्याची नवी फाइल मलिकांच्या हाती लागली असून, त्यावरचे तब्बल २०० किलो वजनाचे पुरावे घेऊन मलिक हे दरेकरांवर चाल करण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले होते. वेट अँड वॉच असे सूचक विधान करत मलिकांनी प्रवीण दरेकरांना इशारा देखील दिला होता. तेव्हापासून मुंबै बँकेच्या घोटाळ्यात लक्ष घातलेल्या मलिकांनी बँक आणि दरेकरांबाबत माहिती गोळा करण्यास सुरुवात केली होती.
महत्वाच्या बातम्या
‘तुम्ही शाहरूखच्या देशाच्या आहात, तुमच्यावर भरोसा आहे’ म्हणत परदेशी फॅनने केली महीलेला मदत
नवीन वर्षाच्या निमित्ताने ईशा गुप्ता झाली रोमॅंटिक; बॉयफ्रेंडसोबतचे लिपलॉकचे फोटो झाले व्हायरल
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ने तोडला ‘KGF’ चा रेकॉर्ड, १३ दिवसात कमावले तब्बल एवढे कोटी