स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर यांनी आज जगाचा निरोप घेतला आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला, जिथे त्या गेल्या एक महिन्यापासून दाखल होत्या. ‘लता दीदी’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर या क्रिकेटच्या मोठ्या चाहत्या होत्या. (lata didi gave 20 lakh to cricket team)
अनेकदा त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून क्रिकेट तसेच वेगवेगळ्या सामन्यांबाबत ट्विट केले जात होते. त्यांचे क्रिकेटवर किती प्रेम होते हे त्यांनी सुमारे ३९ वर्षांपूर्वीच दाखवून दिले होते. १९८३ मध्ये पहिल्यांदा विश्वचषक जिंकून भारतीय क्रिकेट संघ मायदेशी परतला होता, तेव्हा बीसीसीआयकडे खेळाडूंना देण्यासाठी पैसेही नव्हते, त्यामुळे लता मंगेशकर यांनी त्यांना मदत केली होती.
क्रिकेट चाहत्या लता मंगेशकर यांनी १९८३ मध्ये बीसीसीआयला मदत केली होती. आज जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड बीसीसीआयकडे त्यावेळी इतका पैसा नव्हता. १९८३ मध्ये जेव्हा भारतीय संघ जगज्जेता झाला तेव्हा बीसीसीआयकडे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला पगार देण्यासाठीही पैसे नव्हते.
बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष एनकेपी साळवे यांना खेळाडूंना बक्षीस द्यायचे होते पण पैशाअभावी त्यांनाही काही करता येत नव्हते. या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी साळवे यांनी लता मंगेशकर यांची मदत घेतली. लता दीदींनीही होकार दिला.
त्यानंतर भारतीय संघाच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर लता मंगेशकर यांच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. ही मैफल सुपरहिट ठरली. या कार्यक्रमातून त्यांनी २० लाख रुपये कमावले आणि त्यांनी ती सर्व रक्कम भारतीय संघाला बक्षीस म्हणून भेट दिली.
१९८३ चा विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघातील सर्व सदस्यांना प्रत्येकी १ लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले. या कॉन्सर्टसाठी लता मंगेशकर यांनी बीसीसीआयकडून कोणतीही फी घेतली नव्हती. लता मंगेशकर यांचे हे योगदान बीसीसीआय आणि तत्कालीन खेळाडूंनी नेहमी लक्षात ठेवले. बीसीसीआयने तर लता मंगेशकर जिवंत असेपर्यंत भारतातील प्रत्येक स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी त्यांना एक जागा राखून ठेवली जाईल, असा निर्णय घेतला होता
दरम्यान, लत मंगेशकरांवर गेल्या एक महिन्यांपासून उपचार सुरु होते. पण शनिवारी रात्री त्यांची प्रकृती बिघडली आणि रविवारी त्यांचे निधन झाले. पण लता दीदींना ज्या गोष्टीवर सर्वात जास्त प्रेम होते, त्याच गोष्टीतून त्यांना अखेरचा आनंद मिळाला आहे. भारताने शनिवारी रात्री उशिरा अंडर-१९ वर्ल्डकप जिंकला आहे.
भारतीय संघाचे हे १९ वर्षाखालील वर्ल्डकपमधील पाचवे विजेतेपद होते. या कामगिरीचा लता दीदींना मोठा आनंद झाला असेल. ज्या लता दीदी भारताच्या पहिल्या वर्ल्डकपच्या साक्षीदार होत्या, त्या वर्ल्डकपनेच त्यांना अखेरचा आनंद दिला आहे. लता दीदी आज या जगात असत्या तर आज त्यांनी नक्की ट्विट करुन भारतीय संघाचे अभिनंदन केले असते.
महत्वाच्या बातम्या-
पत्नीचा काटा काढल्यानंतर स्वत:च पोलिस स्टेशनमध्ये जाऊन केली बेपत्ता असल्याची तक्रार, असा झाला खुनाचा खुलासा
रहें ना रहें हम, महका करेंगे: अनंतात विलीन झाल्या लता मंगेशकर, भावाने भरलेल्या डोळ्यांनी दिला मुखाग्नी
दुचाकीने परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थिनीसोबत घडलं विपरीत; मैत्रिणीच्या डोळ्यादेखत चिरला गळा





