Share

‘मिल्ट्रीत जाणारा वाघ पैशांसाठी जात नाय, तो कुठल्या भावनेनं तिथं जातो हे तुझ्या डोक्याबाहेरचं’

मोदी सरकारने अग्निपथ योजनेची घोषणा केली आहे. या योजनेवरुन देशभरात वाद सुरु आहे. त्यामुळे मोदी सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आले आहे. ही योजना मागे घेण्याची मागणी काँग्रेससह विरोधी पक्ष सातत्याने करत आहेत. तसेच ही योजना रद्द करण्याची मागणी तरुणांकडून केली जात आहे. (kiran mane criticize agneepath scheme)

या योजने विरोधात विविध राज्यांमध्ये तरुण आंदोलन करत आहे. अनेक ठिकाणी तर गाड्याही जाळल्या जात आहे. घडत असलेल्या हिंसाचारामुळे देशभरात पडसाद उमटत आहे. अशात हवाई दलाने अग्निपथ योजनेतून अग्निवीरांना काय काय सुविधा मिळणार याबाबत माहिती दिली आहे.

त्यानंतर किरण माने यांनी एक पोस्ट केली आहे. जी चांगलीच चर्चेत आली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधल्याचे म्हटले जात आहे. पेन्शन, पगारासाठी कोणताही सैनिक मला काम करताना दिसला नाही, तो फक्त देशासाठी कर्तव्य बजावताना मला दिसला आहे, असे किरण माने यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

किरण माने यांची फेसबूक पोस्ट-
सातारा जिल्ल्यातल्या जवान पोरांच्यात मिल्ट्रीत भरती व्हायचं ही ‘पॅशन’ हाय भावांनो ! पिढ्यानपिढ्या. मी जवळनं बघितलंय. माझ्या सासर्‍यांपास्नं मेहुन्यांपर्यन्त अनेक ‘फौजी’ हायेत. माझे कितीतरी वर्गमित्र मिल्ट्रीमन हायेत. ‘नोकरी’ म्हनून करायची गोष्ट नाय ती गड्याहो, ‘नाद’ हाय त्यो नाद !

…मी कायम या लोकांशी गप्पा मारतो. मला हे ‘याड’ समजून घ्यायचं असतं ! देशाच्या रक्षनासाठी आयुष्य घालवन्यात, लढन्यात, मरन्यात एक वेगळीच नशा दिसते या सगळ्यांच्यात. माझ्या वडलांचे मित्र ले.कर्नल टी.एस.पाटील पाकिस्तानविरूद्धच्या दोन्ही लढायांमध्ये होते. ते त्या लढाईचे किस्से सांगताना कायम म्हनायचे “शहिद व्हायला हवा होतो मी.”… माझ्या बहिणीचे दिर मला कायम गंमतीत म्हनायचे, “या एकदा बाॅर्डरवर. तुम्हाला पाकिस्तानच्या हद्दीतनं फिरवून आणतो.”… माझे चुलत सासरे ‘सियाचीनमध्ये मायनस फिप्टी डिग्री तापमानात आम्ही कसे बंकरमध्ये दिवस काढायचो.’ हे सांगतात अजूनही.

आजपर्यन्तच्या आयुष्यात कुनीही मला पगाराचे, पेन्शनचे, फंडाचे आकडे सांगताना दिसलं नाय मित्रांनो ! नाय नाय नाय नाय. देशासाठी देह कष्टवनं, ह्यो नादच खुळा असतो. शत्रूची माफी मागून सुटका करून घेनार्‍या पळपुट्यांच्या अकलेच्या पलिकडचा हाय त्यो. आपला तुकोबारायाबी त्याकाळात कष्टकर्‍यांच्या, शेतकर्‍यांच्या पोरांना स्वराज्यासाठी लढायची प्रेरणा द्यायचा. त्यो म्हनायचा,
एका बीजा केला नाश । मग भोगलें कणीस ।।
कळे सकळां हा भाव । लहानथोरांवरी जीव ।।
लाभ नाहीं फुकासाठीं । केल्याविण जीवासाठीं ।।
तुका म्हणे रणीं । जीव देता लाभ दुणी ।।
…एका बीजाचा नाश होतो तेंव्हा कणसाचा लाभ होतो.
…सर्वांना हा भाव कळतो. लहान, थोर सर्व जीवांना हाच नियम आहे.
…दुसऱ्या जीवासाठी काही केल्याशिवाय फुकट कुठलाच लाभ होत नाही.
…शेवटी तुका म्हणे, “रणांगणावर जीव दिला तर दुप्पट लाभ होतो.”

कस्लं प्रेरणादायी हाय ह्ये ! धान्याचा एक दाणा स्वतःला मातीत गाडून घेतो. स्वत: नष्ट होतो पन नंतर त्याच एका दाण्याचे हजार दाणे होऊन आपल्याकडे परत येत्यात. आपन आज काय पेरतोय, यावर आपलं भविष्य अवलंबून हाय. आपल्या देशाला गुलामगिरीतनं बाहेर काढन्यासाठी भगतसिंगपास्नं अशपाकउल्लाखान पर्यन्त लै लै लै कितीतरी क्रांतीकारकांनी आपला जीव ववाळून टाकला.. देशप्रेमासाठी. पैसा किंवा पेन्शनसाठी नाय.

सातारा भागात माझे आजोबा मारूती माने, हे क्रांतीसिंह नाना पाटलांना जिथं असतील तिथं भाकरी पोचवायचं काम करत होते. नाना पाटलांपास्नं नागनाथअण्णा नायकवाडींपर्यन्त लोकांनी जीवाची पर्वा न करता आपली आयुष्य स्वातंत्र्यलढ्यात झोकून दिलीत. नाना पाटलांनी इंग्रजांना छ. शिवरायांच्या गनिमी काव्याची कशी झलक दाखवलीवती हे मी आजोबांकडनं ऐकलंय. ही पॅशन होती, पोटापान्याची पर्वा नव्हती यांना.

एकेका कसदार ‘बिजां’नी स्वत:ला मातीत गाडून घेतलं, तवा आपल्याला हे स्वातंत्र्य,समता,बंधुतेच्या दाणेदार कणसांनी बहरलेलं राष्ट्र मिळालंय माझ्या मित्रमैत्रीनींनो ! तुकाराम महाराजांच्या काळात मोगलाई, निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही अशा बलाढ्य परकीय सत्तांची आपल्या मुलूखावर आक्रमणं होत होती. त्या काळात “रणांगणावर प्राण दिला तर दुप्पट लाभ होतो.” हे सांगनं म्हन्जे सरळसरळ स्वराज्यासाठी लढायची प्रेरना देनं ! तुकोबाराया किती महान होता, हे समजून घ्यायचं आसंल तर गाथा ‘अनुभवा’ माझ्या दोस्तांनो.

परवा कुनीतरी सैनिकांना मिळनार्‍या पगारांचा हिशोब मांडून त्यांच्या इनकमचं गुनगान गात होता. त्याला ठनकावून सांगावंसं वाटत होतं, की “भावा मिल्ट्रीत जानारा वाघ असले पैशांचे हिशोब करत नाय. त्यो कुठल्या भावनेनं तिथं जातो हे तुझ्या डोस्क्याभाईरचं हाय. आपलं जिथं पोचत नाय तिथं मुका घ्यायला जाऊ नगं. शब्दांची शस्त्रं घेऊन क्रूर, अत्याचारी, वर्चस्ववादी व्यवस्थेविरूद्ध आयुष्यभर लढून शहिद झालेल्या तुकोबारायांचरनी माझा दंडवत !

महत्वाच्या बातम्या-
“आमचा मुलगा शत्रुच्या गोळ्यांना बळी पडला असता तर अभिमान वाटला असता पण त्याला आमच्याच पोलिसांनी मारले”
शिवसेनेमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर! एकनाथ शिंदे CM ठाकरेंवर नाराज, वाचा नेमकं काय घडलं?
आठ वर्षांपासून काकूचे होते पुतण्यासोबत संबंध, पतीला कळल्यानंतर जे झालं त्यानं अख्खं गाव हादरलं

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now