शुक्रवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘सिल्व्हर ओक’वर आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी धडक मोर्चा काढला. यावेळी काही कर्मचाऱ्यांनी पवारांच्या निवासस्थानावर चपला देखील फेकल्या आणि जोरदार घोषणाबाजी केली.
आता यावरून राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं असून विविधांगी प्रतिक्रिया उमटत आहेत. पवार यांच्या घराबाहेर केलेल्या हिंसक आंदोलनाचं छत्रपती उदयनराजे भोसले यांनी समर्थन केलं आहे. बरोबर झालंच पाहिजे, करायलाच पाहिजे, अजून दगडं मारायला पाहिजे. फार छोटा विचार झाला, असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी पवारांना टोलाही लगावला.
‘कर्म असतं ना.. कर्म.. जे आपण या जन्मी करतो ना.. प्रत्येक जण.. मला लागू होतं तुम्हाला आणि सगळ्यांना लागू होतं. त्यातून सूट कोणाला नाही. जे आपण या जन्मी करतो ते याच जन्मी आपल्याला कोणत्या ना कोणत्या पद्धतीने फेडावं लागतं. अजून काय बोलणार..’ असे उदयनराजे यावेळी म्हणाले.
यावरून आता राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली आहे. जयंत पाटील यांनी उदयनराजेंवर सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे. ‘पवारांनी एसटी कर्मचाऱ्यांना गेली 40 वर्ष वेळोवेळी मदत केली आहे, आधार दिला त्यामुळे खरा एसटी कर्मचारी पवारांच्या घरापर्यंत अशा पद्धतीने जाणार नाही, असे पाटील म्हणाले.
पुढे बोलताना पाटील म्हणाले, ‘हे मुद्दामपणे आणि जाणीवपूर्वक केलेलं काम आहे. जे तिथे आले ते एसटी कर्मचारी होते का, ते कोणत्या परिस्थितीत होते हे सत्य बाहेर येईल? असेही पाटील म्हणाले. याचबरोबर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उदयनराजेंना सुनावलं आहे. ‘ज्या शरद पवारांनी, ज्या पक्षाने तुम्हाला मोठं केलं, तुम्ही उपरे आहात, पण बाडगा मोठ्याने बांग देतो, तो प्रकार आम्ही काल पाहिला, असे संजय राऊत म्हणाले.
राऊत म्हणाले, हल्ल्याचं समर्थन या महाराष्ट्रतील विरोधी पक्षातील लोकं करतायत हा दळभद्री पणाचा कळस आहे, अशा प्रकारे तुम्हाला सरकारला अडचणीत आणता येणार नाही. तुमची बेअब्रु होतेय. पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याच्या घरावर तुम्ही हल्ला करायला लावता हे पाप तुम्ही कुठे फेडाल?, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.