पेट्रोल, डिझेलच्या किंमतींनी आता हाहाकार माजविण्यास सुरुवात केली आहे. देशाने कधी पाहिले नाहीत एवढे दर वाढू लागले आहेत. अशावेळी कुठे पैसे वाचवायचे आणि कुठे नाही असे आता लोकांना झाले आहे. दररोज वाढणाऱ्या इंधनदरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
विशेष बाब म्हणजे गेल्या 12 ते 15 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर दररोज काही पैशांनी वाढताना दिसत आहेत. त्यामुळेच, आज पेट्रोलचे दर तब्बल 120 रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचले आहेत. देशातील 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर 15 दिवसांनी ही दरवाढ होण्यास सुरुवात झाली.
इंधनदरवाढीवरून राजकारण देखील चांगलेच तापले आहे. विरोधकांना केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. तर दुसरीकडे इंधनदरवाढ आणि महागाईवरून कॉंग्रेसने आंदोलन देखील केले आहेत. असे असतानाच आता भाजप खासदाराने पक्षाला घरचा आहेर दिला आहे.
इंधनदरवाढीवरून पुन्हा एकदा भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या पक्षाला घरचा आहेर दिला असून मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर जोरदार टीका केली आहे. इंधनदरवाढीच्या मुद्द्यावरुन अप्रत्यक्षपणे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर स्वामी यांनी टीका केली आहे.
दरम्यान, याबाबत ट्विट करत सुब्रमण्यम स्वामी म्हणतात, “पेट्रोल, डिझेल आणि केरोसीनच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने देशात बंडखोरीची परिस्थिती निर्माण होत आहे. हे करणे ही अर्थ मंत्रालयाची बौद्धिक दिवाळखोरी आहे. हे देशविरोधीही आहे. या किमती वाढवून अर्थसंकल्पीय तूट भरून काढणे ही निव्वळ अक्षमता आहे.’