९ लहान बाळांचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करणाऱ्या गावित बहिणींना मरेपर्यंत जन्मठेप देण्यात आली आहे. २००१ साली या गावित बहिणींना मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावली होती. पण २० वर्षांनंतरदेखील या शिक्षेची अमंलबजावणी झाली नव्हती. त्यामुळे जगण्याची उमेद वाढल्याचा दावा करत या गावित बहिणींनी हायकोर्टात दयेची याचिका दाखल केली होती.
त्यामुळे गावित बहिणींना फाशी मिळणार की मरेपर्यंत जन्मठेप राहणार असा प्रश्न निर्माण झाला होता. आज मुंबई उच्च न्यायालयाने या याचिकेवर निकाल देत गावित बहिणींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे.
या दोन बहिणींची कहाणी खुप भयानक आहे जी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आतापर्यंत त्यांनी ४२ लहान मुलांची हत्या केली आहे. पण त्यांनी या हत्या का केल्या असा प्रश्न अनेकांना पडत आहे. पुण्यातील ज्या येरवडा जेलमध्ये कसाबला फाशी देण्यात आली होती आणि ज्या जेलमध्ये संजय दत्तला ठेवण्यात आले होते. या कारागृहात या दोन बहिणींना २३ वर्षांपासून ठेवण्यात आले आहे.
दोघी सख्ख्या बहिणी आहेत. मोठीचे नाव रेणुका तर लहान बहिणीचे नाव सीमा आहे. या दोघींनी 42 मुलांची हत्या केली आहे. या खुनांमध्ये आणखी एक आरोपी आहे ती म्हणजे दोघींची आई अंजना गावित. त्यांची आई आता या जगात नाही. काही काळापूर्वी एका आजाराने त्यांचा तुरुंगातच मृत्यू झाला. अंजना गावित या मूळच्या नाशिकच्या. तिथे त्या एका ट्रक ड्रायव्हरच्या प्रेमात पडल्या. त्या त्याच्यासोबत पळून पुण्यात आल्या.
काही दिवस एकत्र राहिल्यानंतर त्यांना मुलगी झाली. मुलीचे नाव ‘रेणुका’ होते. मुलीच्या जन्मानंतर काही दिवसांनी तो ट्रकचालक अंजनाला सोडून गेला. रेणुका रस्त्यावर आल्या होत्या. तिला लवकरात लवकर बाळाचे आणि स्वताचे पोट भरायचे होते. एका वर्षानंतर तिची भेट मोहन गावित या निवृत्त सैनिकाशी झाली. दोघांचेही लग्न झाले. त्यानंतर त्यांची दुसरी मुलगी सीमाचा जन्म झाला. काही दिवसांनी मोहन अंजनाला सोडून गेला. ती पुन्हा रस्त्यावर आली. यावेळी तिच्यासोबत दोन मुली होत्या.
मुलींचे पोट भरण्यासाठी तिने किरकोळ चोरी सुरू केल्या. कोणाचा तरी खिसा कापने, कोणाची तरी बॅग घेऊन पळून जाणे. दोन्ही मुली मोठ्या झाल्यावर त्या ही आपल्या आईला चोऱ्या करण्यात मदत करू लागल्या. भीक मागणे आणि खिसा कापणे ही दोन कामे अंजना करत असे. या दोन्ही गोष्टी तिने आपल्या मुलींना शिकवल्या. त्यांच्यासाठी हे काम होते. त्याच्यावरच त्यांचे पोट भरत होते. पुणे शहरात त्यांचे कोणीच नव्हते.
एके दिवशी अंजना रस्त्यावर चालली होती. तिला 18 महिन्यांचे बाळ दिसले. हे मुल भीक मागणाऱ्या महिलेचे होते. त्या मुलाचे नाव संतोष होते. ते मुल घेऊन ती घरी आली.मुलाला कुठेतरी विकून काही पैसे मिळतील असे अंजनाला वाटले. बाळ मांडीवर होते. बाळाला घेऊन ती रस्त्यावर भटकत होती. मंदिराजवळ एका व्यक्तीच्या पर्सला मारण्याचा प्रयत्न केला पण तिला लोकांनी पकडले. महिलांनी अंजनाला मारहाण करण्यास सुरुवात केली.
पोलिसांना बोलवायची वेळ आली. चोरीवरून जमावाचे लक्ष वळवण्यासाठी तिने हातातील त्या लहान मुलाला जमिनीवर फेकले. मुलाच्या डोक्यातून रक्त वाहू लागले. आता लोकांचे लक्ष अंजनाच्या चोरीकडे नव्हते तर त्या लहान मुलाकडे होते. अंजना ओरडू लागली की एका लहान मुलाची आई चोरी करू शकत नाही. लहान मुलाला पाहून लोकांना तिची दया आली.
कदाचित तिने चोरी केली नसेल असे त्यांना वाटले. जर केली असेल तर त्या मुलासाठी केली असेल असे लोकांना वाटले. हे मूल तिचे नाही, त्याचे अपहरण झाले आहे, हे कोणालाच माहीत नव्हते. मुलाचा चेहरा पाहून कोणीही पोलिसांत तक्रार केली नाही. जमावाच्या मारहाणीतून अंजनाही बचावली. तीही पोलिसांच्या हातून निसटली. ती शांतपणे मुलासह तिथून निघून गेली. सीमा जवळच उभी होती. तीसुद्धा आपल्या आईसोबत आली. मुलाच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत होता. तो सतत रडत होता.
जेवण नाही, दुध नाही, आईवडील नाहीत. त्याच्या रडण्याने अंजना आणि तिची मुलगी सीमा अस्वस्था झाल्या. अंजनालाही भीती वाटत होती की, मूल आपल्यासोबत राहिल्यास पोलीस तिला कधीतरी पकडतील. हा धोका पाहून दोघांनीही मुलाला लपवण्याचा कट रचला. सुनसान रस्त्यावर दोघांना विजेचा खांब पाहिला. अंजनाने मुलाचे दोन्ही पाय पकडून त्याचे डोके खांबावर आपटले. जोपर्यंत त्या मुलाचा जीव जात नाही तोपर्यंत त्याचे डोके त्या खांबावर आदळले.
त्यांनी मृतदेह जवळच असलेल्या कचऱ्यात फेकून दिला. या घटनेवरून अंजनाला वाटले की मूल सोबत असेल तर सहानुभूती मिळते आणि जास्त भीक मिळते. चोरी करताना पकडले गेले तरी मूल पाहून लोक निघून जातात. यानंतर या माय-लेकींनी मुले चोरायला सुरूवात केली. या टोळीचा पर्दाफाश होईपर्यंत हे सुरूच होते. म्हणजे १९९६ सालापर्यंत त्यांनी हे कारनामे सुरूच ठेवले.
मुलांना मारणे हा आता त्यांचा व्यवसाय झाला होता. तिने मुख्यतः चार वर्षांपेक्षा लहान मुलांच्या चोऱ्या त्यांनी सुरू केल्या. कारण त्यांना मोठ्या मुलांना सांभाळणे अवघड झाले असते. मोठ्या मुलांनी कोणाकडे तक्रार केली तर त्यांच्या अडचणीत वाढ झाली असती. बहुतेक मुलं झोपडपट्टीतून चोरलेली असायची. अशा मुलांची चोरी करणे सोपे गेले असते, दुसरे म्हणजे, त्यांचा तपास कोणी करत नाही आणि बातम्याही छापत नाहीत. तिघींनीही हे सुरूच ठेवले.
मुलाला घ्यायचे आणि चोरी करायला निघायचे. जर चोरी करताना लोकांनी पकडले तर बाळाला जमीनीवर फेकायचे आणि लोकांचे लक्ष विचलित करायचे. अशा प्रकारे, मुलांचा ढालीप्रमाणे वापर त्यांनी केला. नंतर, जर मुलाचा उपयोग झाला नाही तर मुलांची हत्या करायची. बहुतेक मुलांना आपटून आपटून मारले. एका लहान मुलीला तिच्या गळ्यावर पाय देऊन मारले तर दुसऱ्या मुलीचे दोन्ही पाय पकडून तिला उलटे लटकवले आणि डोके पाण्यात बुडवून तिला मारले.
जोपर्यंत मुलगी वेदनांनी मरत नाही तोपर्यंत तिचे डोके पाण्यात बुडवून ठेवले. दरम्यान, अंजनाची मोठी मुलगी रेणुका हिचेही लग्न झाले. किरण शिंदे असे तिच्या नवऱ्याचे नाव होते. त्यांना मुलेही होती. ही बाब उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी किरणला अटक केली. त्याची चौकशी केली. त्याचा या खुनांमध्ये फारसा सहभाग नव्हता. त्यामुळे त्याच्यावर मोठी केस झाली नाही.
जर तो सरकारी साक्षीदार झाला तर त्याची या प्रकरणात निर्दोष मुक्तता होईल, अशी तयारी पोलिसांनी दाखवली होती. त्यानंतर जी माहिती समोर आली त्याचा विचार पोलिसांनीही कधी केला नव्हता. रेणुकाच्या पतीने सांगितले की, एकदा त्याची पत्नी तिने किती लहान मुलांना मारले हे मोजत होती. तिघींनी मिळून 42 मुलांची हत्या केली होती. यानंतर ही घटना महाराष्ट्रातील वृत्तपत्रांची हेडलाईन बनली. याआधी भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणावर हत्या झाल्या नाहीत.
सीरियल किलिंगच्या या प्रकरणाने महाराष्ट्र हादरला होता. केवळ भारतच नाही तर जगातील सर्वात भयानक आणि वेदनादायक प्रकरणांपैकी एक हे प्रकरण होते. राज्य सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी सीआयडी पथकाची स्थापना केली. खून आणि अपहरणाची प्रकरणे 1990 ते 1996 या कालावधीतील होती. त्यामुळे, बहुतेक प्रकरणांमध्ये, पुरावे सापडले नाहीत. मात्र 13 अपहरण आणि 6 खुनाच्या गुन्ह्यात या तिघांचा सहभाग सिद्ध झाला.
दोन वर्षांच्या नजरकैदेनंतर म्हणजेच १९९८ मध्ये दोघींची आई म्हणजे अंजनाचा आजाराने मृत्यू झाला. बाकी रेणुका आणि सीमा यांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती. 2001 मध्ये सत्र न्यायालयाने दोन्ही बहिणींना फाशीची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली. 2004 मध्ये उच्च न्यायालयानेही ‘फाशीची शिक्षा’ कायम ठेवली होती. हे प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात पोहोचले.
अशा महिलांसाठी ‘फाशीची शिक्षाच योग्य आहे असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. अजून एक शेवटची संधी त्यांच्यासाठी बाकी होती ती म्हणजे राष्ट्रपतींची माफी मागण्याची. 2014 मध्ये ‘प्रणव मुखर्जी’ राष्ट्रपती होते. मुखर्जींनीही दोन्ही बहिणींवर दयामाया दाखवली नाही. न्यायालयाच्या निर्णयाशी सहमती दर्शवली होती. आता त्यांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
अशा महिलांसाठी ‘फाशीची शिक्षाच योग्य आहे असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. अजून एक शेवटची संधी त्यांच्यासाठी बाकी होती ती म्हणजे राष्ट्रपतींची माफी मागण्याची. 2014 मध्ये ‘प्रणव मुखर्जी’ राष्ट्रपती होते. मुखर्जींनीही दोन्ही बहिणींवर दयामाया दाखवली नाही. न्यायालयाच्या निर्णयाशी सहमती दर्शवली होती. आता त्यांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.