एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर ज्या ज्या आमदारांनी त्यांना साथ दिली आहे त्यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून बंडखोर आमदारांच्या कार्यालयांवर दगडफेक केली, तोडफोड केली आणि त्यांच्या बॅनरवर काळं फासलं.
ठाण्यातील एकनाथ शिंदे यांच्याही कार्यालयावर हल्ला झाला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी रस्त्यावर उतरून शक्तीप्रदर्शन केलं. यावेळी त्यांच्यासोबत ठाण्याचे महापौर नरेश म्हस्केसुद्धा होते. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. कार्यकर्त्यांनी त्यांच्या समर्थनार्थ घोषणाही दिल्या.
शिंदे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणाही त्यांनी दिल्या. मी शिंदे साहेबांसोबत आहे असं नरेश म्हस्के यावेळी म्हणाले. यावेळी श्रीकांत शिंदे म्हणाले की, ठाणे जिल्ह्याची परिस्थिती पाहिली तर आपण दुसऱ्या पक्षाची गळचेपी कधी केली नाही. पण बाहेर जिल्ह्यात जिथे राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे तिथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची काय अवस्था आहे?
ग्रामीण भागात राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे साखर कारखाने आहेत, पण आज शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा ऊस नेला जात नव्हता. अशी अवस्था जर शिवसैनिकांची होत असेल तर सत्तेत राहण्यात काय अर्थ आहे? शिवसेनेला दाबण्याचं काम या दोन्ही पक्षांकडून झालं आहे आणि खासकरून राष्ट्रवादीकडून झालं आहे.
नेतृत्वाकडून अनेकवेळा तक्रारी आल्या, पण ऐकलं गेलं नाही, म्हणून आपल्यावर ही वेळ आली आहे असं श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले. जिवाची परवा न करता एकनाथ शिंदेंनी कोरोनात काम केलं. कोरोनाकाळात ते घरी बसून राहिले नाहीत. सध्या प्रामाणिक शिवसैनिकांची माथी भडकवण्याची कामं सुरू आहेत.
एकनाथ शिंदेंचं घर कार्यकर्त्यांसाठी २४ तास खुलं असतं, असंही श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यावेळी म्हणाले की, ठाणे महानगरपालिकेचे काम करत असताना खुप त्रास झाला. अनेक अडचणी आल्या. आपण महाविकास आघाडी सरकारमध्ये असतानाही ठाण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी खुप त्रास दिला.
ज्यावेळी ऑक्सिजनचा प्रश्न होता तेव्हा ठाणे महापालिकेने स्वत: ऑक्सिजन निर्माण केला. तरीही महापालिकेला बदनाम करण्यासाठी महासभेदिवशी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आंदोलन केलं, कशासाठी? महाविकास आघाडीत असताना तुम्ही आम्हाला साथ दिली पाहिजे पाहिजे तिथे तुम्ही आमच्याच विरोधात आंदोलन करताय, मग कसली आलीये आघाडी? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
महत्वाच्या बातम्या
शिंदेच्या हातात काहीच नाही, त्यांचं त्यांचे खाणे-पिणे, आंघोळ सगळं भाजप ठरवतंय, राऊतांचा दावा
अवघ्या २३ व्या वर्षी साताऱ्याच्या जवानाला कश्मीरमध्ये वीरमरण; लष्कराच्या ‘या’ मिशनमध्ये शहीद
पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट, दिंडीतील वारकऱ्यांचे लाखोंचे दागिने चोरट्यांनी केले लंपास
तोडफोडीनंतर तानाजी सावंतांची शिवसैनिकांना धमकी, औकातीत राहा, इथून आल्यानंतर जशास तसे