‘भाऊ तुमच्यामुळेच मी खासदार झालो’; विजयाचा जल्लोष सोडून महाडिक गेले जगतापांच्या भेटीला

राज्यसभा निवडणूकीत पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची खेळी यशस्वी ‌ठरली आहे. राज्यसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवणारे शिवसेनेचे संजय पवार यांचा भाजपाचे धनंजय महाडिक यांनी पराभव केला आहे.

सहाव्या जागेसाठी शिवसेनेच्या संजय पवार आणि भाजपाच्या धनंजय महाडिकांमध्ये जोरदार लढत सुरू होती. त्यामध्ये आता धनंजय महाडिकांनी बाजी मारली आहे. पुण्यातील भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप गंभीर आजाराने त्रस्त असतानाही मतदान प्रक्रियेत सहभागी झाले.

तर काल रात्री नवनिर्वाचित खासदार महाडिकांनी आमदार जगतापांच्या पिंपरी-चिंचवडमधील निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांनी लक्ष्मण जगताप यांचे आभार मानले. यावेळी त्यांचे जगताप कुटुंबियांच्या वतीने औक्षण करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी बोलताना महाडिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘लक्ष्मणभाऊंमुळे दुसऱ्यांदा खासदार होण्याचा माझा मार्ग सुकर झाला. “भाऊ, तुमच्यामुळे मी पुन्हा एकदा खासदार होऊ शकलो. तुमची पक्षनिष्ठा, लढवय्येपणा आणि प्रबळ इच्छाशक्ती भाजपच नाही तर सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना कायम प्रेरणा देणारी आहे”.

दरम्यान, लक्ष्मण जगताप हे गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्यामुळे पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दीड महिन्यांच्या उपचारानंतर त्यांना २ जून रोजी डिस्चार्ज देण्यात आला होता. राज्यसभा निवडणुकीत ते आपला मतदानाचा अधिकार बजवणार का? याबद्दल चर्चा होती.

या राज्यसभा निवडणुकीत भाजपचे तीन तर महाविकास आघाडीचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. राज्यसभा निवडणूकीत पुन्हा एकदा फडणवीसांची खेळी यशस्वी ठरली आहे. महाविकास आघाडीची ९ मते फुटली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पहिल्या पसंतीची २७ मते ही धनंजय महाडिक यांना मिळाली आहे. तर धनंजय महाडिक यांच्याविरोधात असलेले शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना ३३ मते मिळाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या