Share

‘कोरोना वाढत आहे, मास्क वापरा’; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागरिकांना आवाहन

गेल्या काही महिन्यांपूर्वी सरकारने कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येचा घसरता आलेख पाहता मास्क बंदी हटवली होती. मात्र आता कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला ‘मास्क वापरत राहा’ असे आवाहन केले आहे. सध्या कोरोना रुग्णांमध्ये संथपणे वाढ दिसत असल्यामुळे राज्यातील जनतेने मास्क वापरत राहावे असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून त्यांनी जनतेला हे आवाहन केलं आहे.

तसेच रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या कमी असली तरी कोरोना पूर्णपणे गेलेला नाही हे लक्षात घेऊन सर्वांनी सावधगिरी बाळगणे आणि त्यासाठी मास्क घालत राहणे, लस घेणे आवश्यक आहे असेही आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. त्यामुळे आता नागरिकांची चिंता वाढली आहे.

सध्याची आकडेवारी पाहता, राज्याची साप्ताहिक पॉझिटीव्हिटी 1.59 टक्के असून मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त पॉझिटीव्हिटी आढळते. मुंबईत रुग्णसंख्येत 52.79 टक्के वाढ झाली असून ठाण्यामध्ये 27.92 टक्के तर रायगड आणि पालघर जिल्ह्यात 18.52 टक्के 68.75 टक्के इतकी वाढ झाली आहे.

मुंबईत गुरुवारी तब्बल 350 रुग्ण सापडले.11 फेब्रुवारी नंतरची ही सर्वांधिक रुग्णसंख्या आहे. बुधवारी 295 रुग्णांची नोंद झाली होती. मुंबईत कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात आल्यानंतर 30 पर्यंत खाली आलेली दैनंदिन रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांपासून सरासरी 200 इतकी नोंदवली जात आहे.

10 मे रोजी मुंबईत केवळ 844 सक्रिय रुग्ण होते. 25 मे रोजी ही संख्या 1531 वरती पोहोचलेली आहे. शिवाय रुग्णदुपटीचा कालावधी निम्म्याने घटून 6453 दिवसांवरून 3973 दिवसांवर आला आहे. त्यामुळे आता कोरोना बाबत चिंता व्यक्त केली जात आहे. वाढणाऱ्या रुग्णसंख्येकडे पाहता राज्य सरकार पुढे कोणता निर्णय घेणार पाहावे लागेल.

आरोग्य

Join WhatsApp

Join Now