गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे मध्यंतरी गोपीचंद पडळकर यांच्यावर आटपाडी येथे हल्ला झाल्याचीही घटना घडली होती. यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडे पडळकर यांना संरक्षण देण्याची मागणी वारंवार केली होती.
‘सरकारविरोधात बोलणाऱ्यांवर हल्ले होणार असतील त्यांना सुरक्षाही द्यायची नाही असं कसं चालेल. सुरक्षा देणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे,’ असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. मात्र, राज्य सरकारकडून त्यांना अद्याप सुरक्षा पुरविण्यात आलेली नाही.
त्यानंतर भाजपने थेट केंद्राकडे मागणी केली. भाजपच्या मागणीनंतर केंद्र सरकारनेच पडळकर यांना X सुरक्षा दिली आहे. याचबरोबर अभिनेत्री कंगना राणावत, भाजप खासदार किरीट सोमय्या, आमदार नवनीत राणा आणि त्यानंतर आता गोपीचंद पडळकर यांचेही नाव आता या यादीत आले आहे.
काही दिवसांपासून पडळकर हे थेट राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. पडळकर हे सातत्याने पवारांवर जहरी शब्दांत टीका करताना पाहायला मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी पडळकर यांच्यावर सोलापुरात हल्ला झाला होता.
त्यावेळी त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली होती. त्यानंतर सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथेही त्यांच्यावर हल्ला झाला होता. दरम्यान, वाचा काय असते एक्स सुरक्षा… एक्स दर्जाची सुरक्षा हा सुरक्षा श्रेणीचा चौथा स्तर आहे. या श्रेणीत दोन सुरक्षा रक्षक तैनात असतात. ज्यामध्ये एक पीएसओ असतो.