राज्यात एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पहिली ग्रामपंचायत निवडणूक पार पडत आहे. सध्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे, एकूण ५४७ जागांसाठी ही मतमोजणी सुरू आहे. आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार शिवसेना बॅकफूटवर दिसत आहे.
राज्यातील ६०८ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. एकूण १६ जिल्ह्यातील ५४७ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, यात भाजपने सेंच्युरी पूर्ण केली आहे. तर, राष्ट्रवादीने देखील ५८ जागा जिंकत अर्धशतक झळकावलं आहे.
या निवडणुकीत काँग्रेस तिसऱ्या स्थानावर असून शिवसेना आणि शिंदे गटामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. माहितीनुसार, ६०८ ग्रामपंचायतींपैकी ५१ जागा बिनविरोधी झाल्या आहेत. आतापर्यंत २७६ जागांचा निकाल हाती आला आहे.
भाजप आणि शिंदे गटाने १२७ जागांवर बाजी मारली आहे. तर पक्षानिहाय विचार केला तर, भाजपने १०४ जागा जिंकल्या आहे. तर शिंदे गटाने २४ जागांवर बाजी मारली आहे. यात राष्ट्रवादीने सर्वाधिक म्हणजेच ६० जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसने २३ आणि शिवसेना १७ जागा जिंकल्या आहे.
इतर अपक्षांनी ४८जागा जिंकल्या आहेत. अजूनही मतमोजणी सुरू आहे. दरम्यान, राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँगेस आणि काँग्रेस पक्षाने सर्वाधिक ग्रामपंचायती मिळवल्या असल्याचा दावा आता राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.
ग्रामपंचायत निवडणुक ही चिन्हावर लढवली जात नाही. त्यामुळे असा कुणी दावा करत असेल तर ते चुकीचे आहे असा टोला जयंत पाटील यांनी भाजप आणि शिंदे गटाला लगावला आहे. तर अमरावती जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेसने राणा दाम्पत्याला चांगलाच धक्का दिला आहे.