एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. त्यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांनासोबत घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. पण या सरकारवर विरोधी पक्षनेते वारंवार टीका करताना दिसून येत आहे.
हे सरकार लवकरच पडेल असे विरोधी पक्षातील नेते म्हणताना दिसून येत आहे. अशात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे-भाजप सरकारवर टीका केली आहे. हे सरकार लवकरच कोसळणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
राज्यातील शिंदे भाजप सरकार लवकरच कोसळणार आहे. पडद्यामागे राजकीय भूकंपाची तयारी होत आहे. रावसाहेब दानवे केंद्रीय मंत्री असल्यामुळे त्यांच्यापर्यंत या हालचाली गेल्या असतील, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला होता. यावेळी पुढील दोन महिन्यात काय होईल? असे पत्रकारांनी विचारले होते. त्यावेळी त्यांनी ही मोठी भविष्यवाणी केली आहे. पुढील दोन महिन्यात भाजप-शिंदे सरकार कोसळणार आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
रावसाहेब दानवे यांनी सांगितले आहे की दोन महिन्यात काय होईल हे सांगता येत नाही. मला वाटते की त्यांना आमच्या हालचालींबाबत त्यांना माहिती मिळाली असावी. पडद्यामागे काही हालचाली सुरू आहे. केंद्रीयमंत्री असल्याने त्यांच्यापर्यंत त्या पोहचल्या असतील, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
तसेच लवकरात लवकर राज्यातील सरकार घालवलं नाही, तर केंद्र सरकार आणि त्यांचे हस्तक राज्याचे पाच तुकडे करतील. हे सरकार गेल्या साडेतीन महिन्यापासून महाराष्ट्राला कुरतडण्याचे काम करत आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.