राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी आज पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. आज अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतल्या सिल्व्हर ओक निवासस्थानाबाहेर संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं. यावेळी कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले.
आक्रमक एसटी कर्मचाऱ्यांनी सिल्व्हर ओकच्या आवारात घुसून पवार यांच्या निवासस्थानावर दगडफेक आणि चप्पलफेक केली. तसेच संपकरी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्याविरोधात आक्रमक घोषणाबाजी केली. एसटी महामंडळाचे विलीनीकरण पूर्णपणे करावं या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा एक गट आक्रमक झालेला पाहायला मिळाला.
या प्रकरणावरून आता राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. भाजप नेते निलेश राणे यान ट्विट करत थेट शरद पवारांवर टीका केली आहे. काय उपयोग 50 वर्ष राजकारणात असून? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
ट्विटमध्ये निलेश राणे म्हणतात, ‘काय उपयोग 50 वर्ष राजकारणात असून? सामान्य लोकं घरावर चप्पल आणि दगडी घेऊन आले. पवार साहेब आता तरी सन्यास घ्या, गप घरी बसा, असा खोचक सल्लाही निलेश राणे यांनी दिला आहे. निलेश राणे यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.
https://twitter.com/meNeeleshNRane/status/1512376432906973187?s=20&t=xECCpaOAoh9zSP2nRHpKgg
व्हिडिओ पोस्ट करताना त्यांनी म्हंटलं आहे की, ‘आयुष्यभर घाणेरडं राजकारण केल्यावर काय परिणाम होतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा व्हिडिओ. सध्या निलेश राणे यांच्या या ट्विटची तुफान चर्चा होतं असून यावर आता राष्ट्रवादीचे नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरवणार आहे.
वाचा घडलेल्या या घटनेबाबत बोलताना शरद पवार काय म्हणाले… आज झालेल्या हल्ल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, “कोणत्याही आंदोलनात टोकाची भूमिका घेण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही. कोणी चुकीचा रस्ता दाखवत असेल तर त्याला विरोध करण्याची तुमची, माझी, सर्वांची जबाबदारी आहे”, असे शरद पवार म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुढे म्हणाले की, ” गेल्या ५० वर्षात एसटीचे एकही अधिवेशन चुकलेलं नाही. गेल्या काही महिन्यापासून कारण नसताना एसटी कर्मचारी नोकरीच्या बाहेर राहिला आहे. आंदोलनाचे नेतृत्व एसटी कर्मचाऱ्यांना चुकीच्या भूमिका घ्यायला भाग पाडत आहे. नेता चुकीचा असेल तर काय होतं. हे आज दिसलं”, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे.