एकीकडे राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. तर दुसरीकडे डॉल्बीच्या मुद्द्यावर जिल्हा प्रशासन व खासदार उदयनराजे भोसले आमने-सामने येण्याची चिन्हे आहेत. डॉल्बीवरुन उदयनराजे भोसले हे चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले आहे.
आज डॉल्बीवरुन उदयनराजे भडकले आहेत. यामुळे आता या मुद्यावरून राजकारण तापणार असल्याच बोललं जातं आहे. याचबरोबर उत्सव काळात डॉल्बी सिस्टीमला परवानगी नसल्याचे जिल्हा प्रशासनानं सांगितल्यानंतर आज उदयनराजे भोसले यांनी डॉल्बी का नको? याचे कारण द्यावे असा सवाल प्रशासनासह पोलिसांना विचारला आहे.
शुक्रवारी येथील शासकीय विश्रामगृहात काही कामानिमित्त खासदार उदयनराजे यांनी बैठका घेतल्या. बैठकानंतर खासदार उदयनराजे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी बोलताना खासदार उदयनराजे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. थेट पोलिसांना त्यांनी लक्ष केलं.
यावेळी बोलताना खासदार उदयनराजे म्हणाले की, ‘डीजेला विरोध करणाऱ्यांना घरगुती कार्यक्रमात, लग्नात डीजे चालतो. मग सार्वजनिक कार्यक्रमांमध्येच तो का नको?,’ असा संतप्त सवाल खासदार उदयनराजे यांनी उपस्थित केला. सध्या त्यांच्या व्यक्तव्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘कारखान्यांकडून प्रचंड प्रमाणात प्रदूषण केले जात आहे. त्याच्यापुढे ध्वनी प्रदूषण तर फार किरकोळ बाब आहे. काही झालं तरी डीजे वाजलाच पाहिजे. दोन-तीन तास तो वाजल्यास आभाळ कोसळणार नाही,” असं स्पष्टच खासदार उदयनराजे यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, खासदार उदयनराजे पुढे म्हणाले की, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे सातारा जिल्ह्यात डॉल्बी वाजवण्यास पोलीस प्रशासनाने परवानगी दिली. मात्र, नंतर पोलिसांनी यू टर्न घेत डॉल्बीला परवानगी नाहीच, अशी भूमिका मांडली. साताऱ्यात डॉल्बी सिस्टीम वाजलीच पाहिजे.’