अजूनही शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आपलं बंड मागे घेतलेलं नाहीये. शिंदे गटात सहभागी होणाऱ्या नेत्यांची संख्या देखील आता वाढताना पाहायला मिळत आहे. यामुळे शिवसेनेत खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची साथ सोडून मोठ्या संख्येने नेते मंडळी शिंदे गटात गेल्याने शिवसेनेत अस्थिरतेचे वातावरण निर्माण झालं आहे.
तर दुसरीकडे आता शिंदे यांचा गट भाजपसोबत जावून राज्यात सत्ता स्थापन करणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. हे सांगण्याचे कारण म्हणजे, कालच माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची बैठक झाल्याची बातमी समोर आली होती.
मात्र बैठकीत नेमकी कोणती चर्चा झाली, याची माहिती अद्याप समोर आली नाहीय. तर दुसरीकडे सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळातून सत्ता स्थापनेबाबतची एक नवीन माहिती समोर आली आहे. भाजपसोबत गेल्यास शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद मिळू शकते, अशी सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अजित पवार यांनी 2019 मध्ये स्थापन केलेल्या 80 तासांच्या सरकारमध्ये अजित पवारांना असलेली ऑफरच शिंदेंना भाजपने दिल्याची माहिती सध्या मिळाली आहे. यामुळे आता शिंदे गटाला सोबत घेऊन भाजप पुन्हा सत्तेत येणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भाजपसोबत शिंदे गट गेल्यास उपमुख्यमंत्रीपदासह 17 मंत्रिपदं आणि 6 महामंडळं मिळण्याची शक्यता असल्याच बोललं जातं. याचबरोबर शिंदे गटाला मंत्रिमंडळाच्या एकूण क्षमतेच्या 25 टक्के खाती मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सध्या सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील मंत्रिमंडळातल्या 6 मंत्र्यांचा एकनाथ शिंदे गटाला जाहीर पाठिंबा आहे. त्यामुळे ठाकरे सरकारमध्ये सध्या मंत्रिपद असलेल्या त्या सहाही मंत्र्यांना नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.