आता दोन्ही बाजूंकडून व्हीप झुगारलेल्या आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे, बाळासाहेब ठाकरेंबद्दलच्या आदरापोटी आदित्य ठाकरे यांचे नाव वगळून इतर १४ आमदारांना शिंदे गटाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे.
याबाबतची माहिती खुद्द शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी याबाबत माहिती दिली. गोगवले यांनी याबाबत विधानसभा अध्यक्षांकडे तक्रारही दाखल केली होती. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी अध्यक्षपदाची निवडणूक व बहुमत चाचणीसाठी व्हीप काढला होता.
शिवसेनेच्या सर्व आमदारांनी राहुल नार्वेकर यांना मतदान करावे तसेच बहुमत चाचणीवेळी सरकारच्या बाजूने मतदान करण्याचे सांगण्यात आले होते. मात्र विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत व्हीप झुगारून मतदान केल्याने आता शिंदे गटाकडून शिवसेनेच्या १४ आमदारांना आपात्रतेची नोटीस पाठण्यात आली आहे.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांचे नाव वगळून इतर १४ आमदारांना शिंदे गटाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. याबाबत बोलताना गोगावले यांनी म्हंटलं आहे की, आदित्य ठाकरे ते बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत. आम्ही बाळासाहेबांचा आदर करतो. त्यामुळे आदित्य यांना नोटीस पाठवली नाही.
तर दुसरीकडे काल एकनाथ शिंदे सरकारनं आपली दुसरी परीक्षाही पास केली आहे. विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीच्या लढाईत शिंदे-फडणवीस सरकारनं बाजी मारली आहे. शिंदे सरकारच्या विश्वासदर्शक ठरवाला एकूण १६४ सदस्यांनी पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी देखील १६४ सदस्यांनी मतदान केलं होते.