राज्याच्या राजकारणात सध्या अनेक नाट्यमय घटना घडत आहेत. मोठ्या प्रमाणात नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ देत आहेत. अशातच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आणखी एक जवळच्या व्यक्तीने उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. यामुळे शिवसेनेला आणखीनच धक्का बसला आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून शिवसेना लागलेली गळती काही केल्या थांबण्याच नाव घेत नाहीये. शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर हे शिंदेंना पाठिंबा देणार असल्याची गेल्याकाही दिवसांपासून चर्चा सुरु होती. अखेर त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र ठोकला आहे.
आज जालना येथे पत्रकारपरिषदेत खोतकर यांनी आपली भूमिका जाहीर केली. पत्रकारांशी बोलताना खोतकर यांनी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा देत असल्याची घोषणा केली. “उद्धव ठाकरेंशी बोलून एकनाथ शिंदेंना पाठिंब्याचा निर्णय घेतला आहे”, असं सांगताना खोतकर यांना अश्रू अनावर झाले होते.
पुढे बोलताना खोतकर म्हणाले, ‘सकाळीच उद्धव ठाकरेंशी माझं बोलणं झालं. माझ्यावर ओढवेलली माहिती मी सांगितली. त्यानंतर मी संजय राऊतांशी बोललो. कुटुंबियांसाठी मला काही निर्णय करणं गरजेचं आहे, असं सांगताना मी ठाकरेंची परवानगी मागितली.’
त्यानंतर मी आज शिवसैनिकांच्या साक्षीनं मुख्यमंत्री शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला असल्याच त्यांनी स्पष्ट केलं. मी जालन्यात माझी भूमिका माध्यमांसमोर स्पष्ट करेन, असं सांगितलं होतं. त्यानुसार आज मी आपल्याशी बोलत असल्याच देखील त्यांनी नमूद केलं \.
दरम्यान, ‘घरी आलो की कुटुंब दिसते. त्यामुळे काही ठोस निर्णय घेणे गरजेचे होते. या गोष्टी मी ठाकरेंना देखील सांगितल्या. त्यांनीही मला माझा निर्णय घेण्याची परवानगी दिली. त्यामुळे मी आज शिवसैनिकांच्या साक्षीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थन करण्याचा निर्णय घेतला आहे,’ असे खोतकरांनी स्पष्ट केले.